मुंबई : गुन्हे शाखेच्या अमली पदार्थविरोधी कक्षाने मुंबई व उत्तरप्रदेश येथे एकूण 6 ठिकाणी धडक कारवाई करत 7 कोटी 1 लाख रुपये किंमतीचे अमली पदार्थ जप्त केले. याप्रकरणी एकूण नऊ जणांना अटक करण्यात आली असून पोलिसांकडून त्यांची कसून चौकशी सुरू आहे.
एवढ्या मोठ्या प्रमाणात अमली पदार्थ जप्त केल्याने मुंबईत कार्यरत असलेल्या अमली पदार्थांच्या टोळ्यांमध्ये खळबळ उडाली असून या प्रकरणामागील मोठे रॅकेट उघडकीस येण्याची शक्यता पोलीस सुत्रांकडून व्यक्त केली जात आहे.
गुन्हे शाखेच्या अमली पदार्थ विरोधी कक्षाचे पोलीस उपायुक्त नवनाथ ढवळे यांच्या मार्गदर्शनाखालील पथकाला सांताक्रुझ पूर्व वाकोला येथे एक नायरेझियन व्यक्ती कोकोनची विक्री करत असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार सापळा रचून त्याला ताब्यात घेण्यात आले. त्याच्या कडून 523 ग्रॅम वजन असलेले 5 करोड 23 लाख किंमतीचे कोकेन जप्त करण्यात आले.
याशिवाय कुर्ला सीएसटी, माझगाव, घोडपदेव भायखळा, बोरिवली येथून 54 लाख 64 हजार रुपयांचे 211 ग्रॅम एमडी या अमली पदार्थासह 5 जणांना ताब्यात घेण्यात आले. सप्टेंबरमध्ये घाटकोपर युनिटमध्ये दाखल असलेल्या एका गुन्ह्याच्या अनुषंघाने पुढील तपासात उत्तरप्रदेशमध्ये आंतरराज्यीय टोळीमधील तीन आरोपींना अटक करून त्यांच्याकडून 1 कोटी 35 लाख रुपये किंमतीचे अमली पदार्थ जप्त करण्यात आले. याप्रकरणी केलेल्या धडक कारवाईत एकूण 9 अमली पदार्थ तस्करांना अटक करण्यात आल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली.