मुंबई: ससून डॉक आणि जमशेदजी बंदर परिसरातील समुद्रातील तरंगता कचरा यांत्रिक पद्धतीने हटविण्यासाठी आणखी दोन मानवरहित बोटींचा पुरवठा, संचालन आणि देखभाल करण्यास मुंबई महापालिका आयुक्त अश्विनी भिडे यांनी मंजुरी दिली आहे.
मुंबईतील प्रमुख बंदर परिसरातील प्लास्टिक आणि प्रदूषण कमी करण्यासाठी महापालिका आणि बंदर प्राधिकरणांकडून सुरू असलेल्या पर्यावरण स्वच्छता मोहिमेअंतर्गत या प्रकल्पासाठी महापालिकेने ३.६४ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.
स्वयंचलित अथवा दूरस्थ पद्धतीने नियंत्रित करता येणाऱ्या विद्युत आणि सौरऊर्जेवर चालणाऱ्या बोटींच्या माध्यमातून समुद्रातील तरंगता कचरा हटविण्यात येणार आहे. महापालिकेने याच वर्षी मे महिन्यात गेटवे ऑफ इंडिया आणि बधवार पार्क येथे दोन मानवरहित विद्युत बोटी तैनात केल्या होत्या.
या उपक्रमाचे स्वागत करताना कुलाबा येथील भाजपचे नगरसेवक मकरंद नार्वेकर यांनी सांगितले की, या बोटींच्या माध्यमातून दररोज सुमारे ८० ते ९० किलो तरंगता कचरा गोळा केला जात आहे.
या प्रकल्पासाठी अर्थसंकल्पात तरतूद करण्यात आली आहे. महापालिकेचा घनकचरा व्यवस्थापन विभाग निविदेच्या अटी व शर्ती निश्चित करण्याचे काम करीत असून लवकरच निविदा काढण्यात येणार आहेत.
मानवरहित बोटींचे दूरस्थ पद्धतीने नियत्रंण
मनुष्यबळाच्या माध्यमातून कचरा गोळा करण्यास अधिक वेळ लागतो. त्यामुळे या मानवरहित वाहनाचा वापर केला जात असून ते दूरस्थ पद्धतीने नियंत्रित केले जाते. समुद्रकिनारी आढळणारा कचरा गोळा करून त्याचे वर्गीकरण केले जाते व पुनर्वापरासाठी पाठविण्यात येतो.
त्यामुळे पर्यटकांच्या दृष्टीने परिसराचे सौंदर्य वाढण्यास तसेच समुद्रातील प्लास्टिकचे प्रमाण कमी करण्यास मदत होते. या बोटींची कार्यकक्षा सुमारे ५०० मीटर असून त्या बॅटरीवर चालतात. त्यावर सौर पॅनेलही बसविण्यात आले आहेत.
देशातील पहिली महानगरपालिका
मुंबईची किनारपट्टी आणि लगतच्या परिसराची स्वच्छता राखण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करणारी मुंबई महापालिका ही देशातील पहिली महापालिका ठरली आहे. मुंबईतील स्वच्छता आणि घनकचरा व्यवस्थापनासाठी महापालिकेकडून राबविण्यात येत असलेल्या विविध उपाययोजनांचा हा एक भाग आहे.