मुंबई : मुंबई विद्यापीठाच्या अधिसभेची (सिनेट) बैठक शनिवार, दि. 14 मार्च रोजी होणार असून या बैठकीत विद्यापीठाचा वार्षिक अर्थसंकल्प सादर केला जाणार आहे. विद्यापीठाचा आगामी आर्थिक आराखडा तसेच विविध शैक्षणिक व विकासात्मक योजनांवर या बैठकीत चर्चा होणार असल्याने अधिसभेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
कुलगुरू प्रा. रवींद्र कुलकर्णी यंदाच्या अर्थसंकल्पात कोणत्या नव्या योजना जाहीर करणार याकडे विशेष लक्ष लागले आहे. विद्यापीठाचा शैक्षणिक दर्जा उंचावण्यासाठी तसेच विविध विकासात्मक उपक्रम राबवण्यासाठी अर्थसंकल्पात कोणती उद्दिष्टे आणि योजना मांडल्या जातील, हे अधिसभेत स्पष्ट होणार आहे. याशिवाय विद्यार्थी कल्याणकारी योजना, संशोधन प्रोत्साहन, आंतरराष्ट्रीय सहकार्य उपक्रम आणि परीक्षा विभागातील गोंधळ कमी करण्यासाठी कोणत्या उपाययोजना केल्या जातील, याबाबतही उत्सुकता व्यक्त केली जात आहे.
मुंबई विद्यापीठाचा वार्षिक अर्थसंकल्प मंजूर करण्यासाठी आयोजित या अधिसभेत दरवर्षी प्रशासनाच्या कामकाजावर जोरदार चर्चा होत असते. गेल्या काही वर्षांपासून प्रलंबित असलेल्या विविध मुद्द्यांकडे लक्ष वेधत विद्यार्थ्यांच्या न्याय्य हक्कांसाठी युवासेनेचे सिनेट सदस्य आक्रमक भूमिका घेतात यंदाही विद्यार्थी प्रश्न घेवून प्रशासनाला जाब विचारतील अशी शक्यता आहे.
दरम्यान, गुरुवारी अधिसभेपूर्वी कुलगुरू प्रा. कुलकर्णी यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आलेल्या चहापान कार्यक्रमावर युवासेना (ठाकरे गट) समर्थित सिनेट सदस्यांनी बहिष्कार घातला. सिनेट सदस्यांनी उपस्थित केलेले प्रश्न सभेत ग्राह्य धरले जात नसल्याचा आरोप करत विद्यापीठ प्रशासनाच्या भूमिकेचा निषेध म्हणून हा बहिष्कार घालण्यात आल्याचे सदस्यांनी सांगितले.
काय आहेत अर्थसंकल्पाकडून अपेक्षा?
परीक्षांतील गोंधळ, निकाल विलंब टाळावा
मुलींसाठी वसतिगृह, विद्यार्थी निवास सुविधांत वाढ
डिजिटल, तंत्रज्ञानाधारित अध्यापनासाठी निधी
प्रवेश यंत्रणेतील गोंधळ कमी व्हावा
विद्यार्थी प्रश्न सोडवण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा
संशोधन प्रकल्पांसाठी अधिक आर्थिक तरतूद
कल्याणकारी योजना, शिष्यवृत्ती वाढविणे
गेल्यावर्षीचा अर्थसंकल्प
मुंबई विद्यापीठाचा 2025-2026 या वित्तीय वर्षासाठी 968.18 कोटींचा अर्थसंकल्प सादर करण्यात आला होता. यात 147 कोटी 63 लाख रुपयांची तूट दाखवण्यात आली होती. तरीही संशोधन, उच्च शिक्षणाचे आंतरराष्ट्रीयीकरण, विद्यार्थी प्रगती उपक्रम, माजी विद्यार्थी संपर्क व विद्यापीठ-औद्योगिक सहकार्य उपक्रमांसाठी सुमारे 75 कोटींची तरतूद करण्यात आली होती. याशिवाय डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय संशोधन केंद्र, प्रा. बाळ आपटे दालन व सभागृह, स्कूल ऑफ लँग्वेजेस इमारतीचा दुसरा टप्पा, अवेस्ता पहलवी अभ्यास केंद्र, आंतरराष्ट्रीय विद्यार्थी वसतिगृह दुसरा टप्पा, मुलींचे वसतिगृह, वेंगुर्ले येथील सागरी अध्ययन केंद्र, तृतीय व चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांचे निवासी संकुल या विकासकामांसाठी 135 कोटींची तरतूद करण्यात आली होती.