मुंबई ः मुंबई विद्यापीठाशी संलग्नित महाविद्यालयात पदवीचे शिक्षण घेणार्या विद्यार्थ्यांना आता स्पर्धा परीक्षांचे धडे गिरवता येणार आहेत. पदवी अभ्यासक्रमाला प्रविष्ठ विद्यार्थ्यांना यूपीएससी, एमपीएससीसह विविध स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी मुंबई विद्यापीठ आणि ठाणे महापालिका संचालित चिंतामणराव देशमुख प्रशासकीय प्रशिक्षण संस्था यांच्यात सोमवारी सामंजस्य करार करण्यात आला.
मुंबई विद्यापीठाशी संलग्नित महाविद्यालयात पदवीचे शिक्षण घेणार्या विद्यार्थ्यांना महाविद्यालयीन स्तरावरच युपीएससी आणि एमपीएससीसह विविध स्पर्धा परीक्षांसाठीचा अभ्यासक्रम पदवी अभ्यासक्रमाच्या प्रथम वर्ष, द्वितीय वर्ष आणि तृतीय वर्षात खुले वैकल्पिक विषय (दोन क्रेडीट) स्वरुपात उपलब्ध करुन दिला जाणार आहे. तज्ज्ञ व अनुभवी व्यक्तींच्या मार्गदर्शनाखाली हे अभ्यासक्रम तयार करण्यात आले आहेत. ऑनलाईन पद्धतीने विद्यार्थ्यांना उपलब्ध होणार्या या ओपन इलेक्टीव्हचे नियमन चिंतामणराव देशमुख प्रशासकीय प्रशिक्षण संस्थेमार्फत केले जाणार आहे.
मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. रवींद्र कुलकर्णी आणि ठाणे महानगर पालिका आयुक्त सौरभ राव यांच्या उपस्थित करारावर सह्या करण्यात आल्या. या प्रसंगी प्र. कुलगुरू प्राचार्य डॉ. अजय भामरे, कुलसचिव डॉ. प्रसाद कारंडे, ठाणे महानगर पालिका उपायुक्त (शिक्षण) सचिन सांगळे यांच्यासह चिंतामणराव देशमुख प्रशासकीय प्रशिक्षण संस्थेचे संचालक महादेव जगताप, सल्लागार प्रदीप वाघमारे आदी उपस्थित होते.