मुंबई : मुंबई (3) जलवाहिनीवरील अमर महल भूमिगत बोगदा क्रमांक 1 आणि 2 ला जोडलेल्या 2500 मिलीमीटर व्यासाच्या जलवाहिनीच्या छेद-जोडणीची कार्यवाही बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या चमूने 36 तासांच्या सतत प्रयत्नांनंतर यशस्वीरीत्या पूर्ण केली.
ही महत्त्वपूर्ण आणि तांत्रिकदृष्ट्या जटिल कामगिरी निर्धारित वेळेत पूर्ण व्हावी, यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेचे अधिकारी, अभियंते, कर्मचारी आणि कामगार मिळून शंभरपेक्षा अधिक मनुष्यबळ रात्री-दिवस युद्ध पातळीवर कार्यरत होते. यामुळे मुंबईसह पूर्व उपनगरांतील पाणी पुरवठा सुरळित झाला.
जल अभियंता खात्यासह विभाग (वॉर्ड) पातळीवरील अधिकारी - कामगारांच्या सामूहिक, अहोरात्र आणि अथक प्रयत्नांमुळे जलवाहिनीची छेद-जोडणी वेळेवर पूर्ण करणे शक्य झाले आहे. अत्यंत कठीण आणि आव्हानात्मक कामकाज यशस्वीरीत्या पूर्ण झाल्यानंतर जलवाहिनी टप्प्याटप्प्याने कार्यान्वित झाली आहे. यात शहर विभागातील ए, बी, सी, ई, एफ दक्षिण आणि एफ उत्तर तसेच पूर्व उपनगरातील एम पूर्व, एम पश्चिम, एल, एस आणि एन विभागांचा पाणीपुरवठा बुधवार पहाटेपासून सुरळीत झाला.