मुंबई: संजय गांधी राष्ट्रीय उद्यान आणि येओर या भागातील १,००० हून अधिक आदिवासींनी राष्ट्रीय उद्यानाच्या प्रवेशद्वारापासून राजभवनाकडे कूच केले. आदिवासी एकता परिषदेच्या नेतृत्वाखाली दुपारी १२ वाजता संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या प्रवेशद्वारावरून हा मोर्चा सुरू झाला.
यावेळी आदिवासींची पोलिसांशी झटापट झाली. याप्रसंगी अनेक ठिकाणी लावलेले बॅरिकेड्स त्यांनी पार केले. हा मोर्चा आता मालाड येथे पोहोचला असून तिथेही त्यांना आणखी एका बॅरिकेडचा सामना करावा लागला.
आज रात्री हा मोर्चा गोरेगाव चेक नाका येथे मुक्काम करून उद्या सकाळी वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्सच्या दिशेने पुन्हा प्रवास सुरू करेल. त्याठिकाणीही मोर्चाचा मुक्काम असेल. त्यानंतर १३ सप्टेंबर रोजी हा मोर्चा राजभवनाच्या दिशेने जाणार आहे.
मोर्चाच्या मागण्या
वनहक्क: 'वनहक्क कायदा २००६' ची कठोर आणि तातडीने अंमलबजावणी करा तसेच वैयक्तिक व सामुदायिक वनहक्क दावे त्वरित मंजूर करणे.
पेसा कायदा : 'पेसा कायदा १९९६' ची काटेकोर अंमलबजावणी करा, स्थानिक ग्रामसभेच्या स्पष्ट पूर्वपरवानगीशिवाय कोणताही प्रकल्प सुरू करू नका
विस्थापन थांबवणे: पायाभूत सुविधा व खासगी कॉर्पोरेट कॉरिडॉर्ससाठी होणारे सक्तीचे विस्थापन आणि अन्यायकारक जमीन अधिग्रहण त्वरित थांबवणे.
अत्यावश्यक सुविधा : वनविभागाकडून निर्माण केल्या जाणाऱ्या प्रशासकीय अडथळ्यांशिवाय, आदिवासी पाड्यांवर स्वच्छ पाणी, वीज, सर्व-हंगामी रस्ते, शाळा आणि आरोग्य केंद्रे यांचा अखंड पुरवठा करा
आदिवासी शिक्षणाचे रक्षण: ४९० आदिवासी आश्रमशाळांचे खासगीकरण करण्याचा निर्णय मागे घ्यावा आणि आदिवासी मुलांसाठी उच्च दर्जाचे पौष्टिक जेवण व शिक्षण सुनिश्चित करणे.