Delivery Riders Traffic Violations pudhari photo
मुंबई

Delivery Riders Traffic Violations : दहा मिनिटांच्या डिलिव्हरीसाठी जीवघेणी घाई

मुंबईतील रस्‍त्‍यांवरची वाहतुकीची शिस्‍त धोक्‍यात; १,४८० चलने, गुन्हे दाखल; १७ वाहने जप्त

पुढारी वृत्तसेवा

मुंबई : महेश पांचाळ

दहा मिनिटांत घरपोच वस्तू पोहोचविण्याच्या ऑनलाइन कंपन्यांच्या स्पर्धेमुळे रस्त्यांवरील वाहतूक शिस्त धोक्यात येत आहे. ऑर्डर वेळेत पोहोचविण्याच्या घाईत काही डिलिव्हर, कुरिअर रायडर्सकडून सिग्नल तोडणे, हेल्मेट न वापरणे, बेदरकारपणे दुचाकी चालविण्याचे प्रकार घडत आहेत. या प्रकारांची गंभीर दखल घेत मुंबई वाहतूक पोलिसांनी २८ ऑक्टोबर ते ४ नोव्हेंबर २०२६ या कालावधीत विशेष मोहीम राबविली. या सात दिवसांत डिलिव्हरी आणि कुरिअर सेवांशी संबंधित दुचाकीस्वारांविरोधात १,४८० चलने आणि गुन्हे दाखल करण्यात आले. तसेच १७ वाहने जप्त करण्यात आली.

ऑनलाइन खाद्यपदार्थ आणि जीवनावश्यक वस्तूंच्या वितरणासाठी कार्यरत कंपन्यांमध्ये ग्राहकांना कमीत कमी वेळेत सेवा देण्याची स्पर्धा सुरू आहे. यामुळे पादचारी आणि अन्य वाहनचालकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे. दहा मिनिटांत डिलिव्हरीचे आश्वासन देणाऱ्या या व्यवसाय पद्धतीमुळे रायडर्सवर वेळेत ऑर्डर पूर्ण करण्याचा दबाव निर्माण होतो. अधिक ऑर्डर पूर्ण केल्यास मिळणारे प्रोत्साहनपर पैसे आणि कामगिरीचे लक्ष्य गाठण्याच्या प्रयत्नात काही रायडर्स वाहतूक नियमांकडे दुर्लक्ष करतात.

डिलिव्हरी रायडर्सवरील कारवाई ही मुंबईतील वाहतूक नियमभंगाच्या मोठ्या समस्येचा एक भाग आहे. जानेवारी ते ऑक्टोबर २०२६ या दहा महिन्यांत हेल्मेट न घालणाऱ्या दुचाकीस्वारांविरोधात ६.२ लाखांहून अधिक चलने जारी करण्यात आली. तिघांनी एका दुचाकीवरून प्रवास केल्याप्रकरणी ३५ हजारांहून अधिक चलने काढण्यात आली अशी माहिती वाहतूक पोलिसांनी दिली.

वेळेवर आधारित डिलिव्हरी थांबवण्यास कंपन्यांना सूचना

  • जून २०२६ मध्ये मुंबई वाहतूक पोलिसांनी ऑनलाइन खाद्यपदार्थ आणि किराणा वितरण कंपन्यांची बैठक घेऊन वेळेवर आधारित डिलिव्हरी पद्धती थांबवण्यास सांगण्यात आले होते.

  • कंपन्यांना त्यांच्या रायडर्सची पोलीस पडताळणी, ई-चलनांची तपासणी आणि नियम मोडणाऱ्यांवर अंतर्गत कारवाई करण्याच्या सूचनाही दिल्या होत्या.

  • जून महिन्यात राबविण्यात आलेल्या मोहिमेत चुकीच्या दिशेने वाहन चालवणे, हेल्मेट न वापरणे, सिग्नल तोडणे, अतिवेग आणि बेकायदा पार्किंग अशा प्रकारांसाठी ८,३९९ डिलिव्हरी रायडर्सवर कारवाई केली होती.

कंपन्यांची जबाबदारीही निश्चित होणार का?

केवळ रायडर्सवर कारवाई करून हा प्रश्न सुटणार नाही. डिलिव्हरीसाठी दिले जाणारे अवास्तव वेळेचे लक्ष्य, कामगिरीवर आधारित प्रोत्साहन आणि वेळेत ऑर्डर पोहोचविण्याचा दबाव यांचाही विचार करणे आवश्यक आहे. कंपन्यांनी रायडर्सना वाहतूक नियमांचे प्रशिक्षण देणे, वाहनांची कागदपत्रे तपासणे, हेल्मेट वापरण्याची सक्ती करणे आणि सुरक्षित वाहनचालकाला प्राधान्य देणारी कार्यपद्धती स्वीकारणे गरजेचे आहे. मुंबईसारख्या गर्दीच्या शहरात काही मिनिटे वाचविण्याच्या नादात एखाद्याचा जीव धोक्यात येणे परवडणारे नाही. ग्राहकांना वेगवान सेवा देण्याच्या स्पर्धेपेक्षा रस्त्यांवरील नागरिकांची सुरक्षितता महत्त्वाची आहे. त्यामुळे रायडर्सबरोबरच त्यांच्याकडून काम करून घेणाऱ्या कंपन्यांची जबाबदारीही निश्चित करण्याची गरज निर्माण झाली आहे.

वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या कोणत्याही व्यक्तीविरोधात, डिलिव्हरी आणि कुरिअर सेवांमधील दुचाकीस्वारांच्या नियमभंगाबाबत कठोर कारवाई केली जाईल. कोणालाही वाहतूक नियमांचे उल्लंघन करण्याची मुभा दिली जाणार नाही.
सत्यनारायण चौधरी, सहपोलीस आयुक्त, मुंबई वाहतूक पोलिस

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT