मुंबई: मुंबई महापालिका मुख्यालयाशेजारील फोर्ट परिसरातील 'टाऊनहॉल जिमखाना'च्या भूखंडाचा कायापालट होणार आहे. या जागेवर महापालिकेच्या प्रशासकीय व क्रीडा वापरासाठी सहा मजली इमारत उभारण्यात येणार आहे.
महापौर, उपमहापौर व विरोधी पक्षनेत्यांसाठी स्वतंत्र दालने, सुमारे ३२० नगरसेवक व लोकप्रतिनिधींची क्षमता असलेले सभागृह, पत्रकार कक्ष, अत्याधुनिक व्यायामशाळा, बॅडमिंटन कोर्ट अशा सुविधांचा या इमारतीत समावेश असेल.
या कामासाठी सुमारे ४४ कोटी ८७ लाख रुपयांचा प्रस्ताव महापालिका प्रशासनाने स्थायी समितीच्या मंजुरीसाठी सादर केला आहे. सुधारित प्रकल्पामुळे भूखंडाचे क्षेत्रफळ आता ५,९५१ चौ. मीटर करण्यात आले आहे.
पुरातन वारसा परिसराचे महत्त्व लक्षात घेऊन आजूबाजूच्या ऐतिहासिक वास्तूंशी सुसंगत अशीच या नवीन इमारतीची रचना असेल. सर्व परवानग्या मिळाल्यानंतर हे काम प्रत्यक्ष सुरू होऊन पुढील २८ महिन्यांत (मार्च २०२९ पर्यंत) पूर्ण करण्याचे महापालिकेचे उद्दिष्ट आहे.
महापालिका मार्गावरील टाऊनहॉल जिमखान्याच्या भूखंडावर ही इमारत उभारण्यात येणार आहे. टाऊनहॉल जिमखान्याचा भूखंड पूर्ण क्षमतेने वापरात नसल्याने त्याचा महापालिकेच्या प्रशासकीय व क्रीडा कामांसाठी प्रभावी वापर करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे.
महापालिका मुख्यालयाच्या ऐतिहासिक वास्तूचा वारसा जपत या जागेचा पुनर्विकास करण्यात येणार आहे. महापालिकेच्या वास्तुशास्त्रज्ञ विभागाने तयार केलेल्या सुधारित आराखड्यानुसार, दोन तळघरे, तळमजला व त्यावर चार मजले अशी इमारतीची रचना असेल.
तळघरात दोनस्तरीय कार पार्किंग आणि स्टॅक पार्किंगची व्यवस्था करण्यात येणारआहे. पहिल्या ते चौथ्या मजल्यावर अंतर्गत पार्किंगसह व्यायामशाळा, इनडोअर खेळांसाठी जागा आणि बॅडमिंटन कोर्ट उभारण्यात येणार आहे.
स्वतंत्र दालनाची तरतूद
या इमारतीत महापौर, उपमहापौर व विरोधी पक्षनेत्यांसाठी स्वतंत्र दालने व कार्यालये असतील. तसेच सुमारे ३२० नगरसेवक आणि लोकप्रतिनिधी बसू शकतील, असे प्रशस्त सभागृह उभारण्यात येणार आहे.
पत्रकारांसाठी स्वतंत्र कक्षाचीही तरतूद करण्यात आली आहे. इमारतीच्या छतावर व्ह्यूइंग गॅलरी, काचेचा घुमट, कॅप्सूल लिफ्ट व कॅफेटेरिया उभारण्यात येणार आहे. त्याचबरोबर सौर ऊर्जा निर्मिती व सांडपाण्याच्या पुनर्वापराची यंत्रणाही बसवण्यात येणार आहे.
‘स्थायी’च्या मंजुरीनंतर कामाला सुरुवात
या प्रकल्पासाठी कंत्राटदाराची निविदा रक्कम २९ कोटी ३० लाख रुपये आहे. जीएसटी, विविध आकार आणि इतर तरतुदींसह निव्वळ कंत्राट किंमत ३५ कोटी ९६ लाख १३,८४२ रुपये झाली आहे.
पाणीपट्टी, मलनिःसारण आकार, पर्यवेक्षण शुल्क व भूमिगत उपयोगिता सेवा स्थलांतरासाठीच्या तरतुदींसह प्रकल्पाचा एकूण खर्च ४४ कोटी ८७ लाख २८,८८७ रुपये होणार आहे. आता स्थायी समितीच्या मंजुरीनंतर प्रकल्पाच्या प्रत्यक्ष कामाला सुरुवात होण्याचा मार्ग मोकळा होणार आहे.
डी. ठक्कर कन्स्ट्रक्शनची निवड
या प्रकल्पासाठी पाच कंपन्यांनी निविदा सादर केल्या होत्या. तांत्रिक छाननीत सर्व कंपन्या पात्र ठरल्या. त्यापैकी भोपाळ सार्वजनिक बांधकाम विभागाकडे अमर्यादित वर्गात नोंदणीकृत असलेल्या मे. डी. ठक्कर कन्स्ट्रक्शन प्रा. लि. या कंपनीने कार्यालयीन अंदाजापेक्षा १२.९६ टक्के कमी दराने निविदा सादर केली.
त्यामुळे या कंपनीची कंत्राटदार म्हणून निवड करण्यात आली आहे. या कंपनीने नागपूर येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय अधिवेशन केंद्राचे ८५ कोटी चार लाख रुपयांचे काम पूर्ण केले आहे.