मुंबई : मुंबईच्या पाच प्रवेशद्वारांवरील टोल नाक्यांवर अर्थात वाशी, ऐरोली, मुलुंड, एलबीएस आणि दहिसर या टोल नाक्यांवरील टोलच्या दरात महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (एमएसआरडीसी) वाढ केली आहे.
मिनी बस, एल.सी.व्ही. ट्रक, बस आणि अवजड वाहनांसाठीच्या टोल दरात १५ ते ३५ रुपयांची वाढ झाली आहे. नवीन टोलचे दर गुरुवारी, १ ऑक्टोबरपासून लागू होतील. त्यानुसार आता मिनी बस, एल.सी.व्ही. वाहनांसाठी ९० रुपये, ट्रक, बससाठी १८० रुपये आणि अवजड वाहनांसाठी २२५ रुपये असे नवीन टोलचे दर गुरुवारपासून लागू होतील.
एमएसआरडीसीने मुंबईत ५५ उड्डाणपूल बांधले आहेत. या पुलांचा बांधकाम खर्च वसूल करण्यासाठी वाशी, ऐरोली, मुलुंड, एलबीएस आणि दहिसर या ठिकाणी पथकर नाके उभारण्यात आले आहेत. हलकी खासगी वाहने, शालेय वाहने तसेच एसटी आणि बेस्टच्या बसना लागू असलेली टोलमाफी कायम राहणार आहे.
मुंबईतील वाशी, ऐरोली, मुलुंड, एलबीएस, दहिसर या टोल नाक्यांवरुन दिवसाला दररोज साडे तीन लाखांहून अधिक वाहने ये-जा करत असतात. ये-जा करणाऱ्या वाहनांपैकी ८० टक्के वाहने हलकी व टोलमुक्त आहेत.
दर तीन वर्षांनी होतेय टोलमध्ये दरवाढ
गेल्या वर्षी शासनाने दिलेल्या निर्देशानुसार हलकी वाहने, बेस्ट बस, एसटी आणि शालेय वाहने यांना टोल आकारला जात नाही. मात्र इतर वाहनांना टोल आकारला जातो. मुंबईच्या प्रवेशद्वारांवरील टोलच्या दरात तीन वर्षांच्या अंतराने सुधारणा केली जाते. यापूर्वी ऑक्टोबर २०२३मध्ये दर बदलण्यात आले होते. त्यानंतर आता दरवाढ करण्यात आली आहे. या पाच टोल नाक्यावर टोलवसुलीची व्यवस्था पुढेही सुरू राहणार आहे. या निर्णयानुसार टोलवसुलीची मुदत सप्टेंबर २०२९पर्यंत वाढविण्यात आली आहे.
वाहन प्रकार - जुने दर - नवे दर
मिनी बस - ७५ - ९०
ट्रक, बस - १५० -१८०
अवजड वाहने - १९०- २२५