मुंबई

मुंबई : धारावीतील स्क्रॅप बाटल्यांचा व्यवसाय डबघाईला 

अविनाश सुतार

धारावी: पुढारी वृत्तसेवा: धारावीतील प्रेमनगर परिसरात टाकाऊ काचेच्या बाटल्यांचा व्यवसाय चांगलाच बहरला होता. येथील बहुतांश गोदामात औषध, सेंट, सरबत, दारू व शीतपेयांच्या काचेच्या बाटल्यांना फोडून त्याचा स्क्रॅप केला जात असे. हा स्क्रॅप ग्लास कंपनीकडे पाठविले जातात. मात्र, गेल्या काही वर्षांपासून या व्यवसायाला उतरती कळा लागली आहे. कचरा वेचकांनी काचेच्या शीतपेय व दारूच्या बाटल्या गोळा करण्याकडे पाठ फिरविल्याने हा व्यवसाय डबघाईला आल्याचे चित्र सध्या दिसत आहे.

देशात मागील काही वर्षांपासून वाढलेली प्लॅस्टिकची लोकप्रियताच या काचेच्या स्क्रॅप व्यवसायाला जबाबदार असल्याचे व्यावसायिकांनी सांगितले. पूर्वी काचेच्या बाटल्या गोळा करणाऱ्या भंगार वेचकांना एका बाटली मागे १ ते २ रुपये मिळत असल्याने भंगारवेचकांची चांगलीच कमाई व्हायची. नगामागे चांगले पैसे मिळत असल्याने भंगार वेचकात कमालीचा उत्साह होता. धारावीतील स्क्रॅप गोदामात रिकाम्या बाटल्या विकणाऱ्या भंगारवाल्यांच्या रांगा लागत होत्या. मात्र गेल्या काही वर्षांपासून या व्यवसायाला घरघर लागली आहे. मद्य व शीतपेय बनविणाऱ्या कंपन्यांनी प्लास्टिकच्या बाटल्यांना आकर्षक लेबल लावून विकण्याचे नवीन ट्रेंड सुरु केल्याने काचेच्या बाटल्या बाजारातून गायब होत आहेत. तसे असताना काचेच्या बाटल्यांचा स्क्रॅप विकत घेणाऱ्या ग्लास कंपन्यांनी स्क्रॅपचे दर घटविल्याने व्यवसायावर मोठा परिणाम झाला.

याबाबत हलीम खान बाटलीवाला म्हणाले की, शीतपेय तसेच मद्याच्या काचेच्या बाटल्या वापरल्यानंतर पुन्हा प्रक्रिया करून विकता येत नसल्यामुळे भंगारवाले कचरा वेचकांकडून २ ते ३ रुपये किलोने या बाटल्या विकत घेऊन त्या बाटल्या स्क्रॅप व्यावसायिकाला ४ ते ५ रुपये किलोने विकतात. स्क्रॅप व्यावसायिक त्या बाटल्यावर प्रक्रिया करून त्या फोडून ग्लास कंपनीला ६ रुपये किलोने विकतात. यात व्यावसायिकांना किलोमागे १ ते २ रुपये मिळतात. त्यात गोदामचे भाडे, वीज मीटर, कर्मचाऱ्यांचा पगार तसेच ट्रान्स्पोर्टचा खर्च उचलावा लागतो. याउलट सरबत, सेंट व औषधांच्या काचेच्या बाटल्यांच्या विक्रीची स्थिती चांगली आहे. कचरा वेचकांकडून या बाटल्या डझनाच्या हिशोबाने विकत घेण्यात येतात. आणि त्या बाटल्या स्वच्छ धुवून त्या- त्या कंपनीला चांगल्या दरात विकल्या जातात.

भंगारवाले दुकानदार काचेच्या बाटल्यांना चांगला भाव देत नसल्याने आम्ही काचेच्या बाटल्या गोळा करण्याचे सोडून दिले आहे. ते प्लास्टिक बाटल्यांना चांगले पैसे देत असल्याने आमचा चांगला फायदा होतो,  असे एका कचरावेचकाने सांगितले.

हेही वाचा 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT