Mumbai Rains Train Traffic Update
मुंबई : मुंबई शहरासह उपनगरात दुपारी साडेतीन वाजल्यापासून वादळी वाऱ्यासह सुरू झालेल्या अवकाळी पावसाने अक्षरशः मुंबईकरांना झोडपून काढले. १०० पेक्षा जास्त ठिकाणी झाडे व झाडाच्या फांद्या पडल्या. इमारती व झोपड्यांवरील अनेक पत्रे उडून गेले. पण सुदैवाने कोणालाही मार लागला नाही.
मुंबईतील पावसामुळे वाहतुकीचा खोळंबा
पश्चिम रेल्वे मार्गावर ग्रँटरोड ते मरीन लाईन दरम्यान ओव्हर हेड वायरमध्ये बिघाड झाल्यामुळे पश्चिम रेल्वे मार्गावरील लोकल सेवा विस्कळीत झाली. या मार्गावरील गाड्या १५ ते २० मिनिट विलंबाने धावत आहेत. मध्य रेल्वेची वाहतूकही पाच ते दहा मिनिट विलंबाने सुरू आहे. त्यात दक्षिण मुंबईसह मध्य मुंबई व उपनगरातील विविध रस्ते पावसामुळे वाहतूक कोंडीत सापडले. त्यामुळे बुधवार मुंबईकरांसाठी त्रासदायक ठरला.
चंदनवाडी स्मशानभूमीजवळ झाड कोसळले
चंदनवाडी स्मशानभूमी व बडा कब्रस्तान जवळून जाणाऱ्या गल्लीमध्ये झाडाची फांदी कोसळली. या रस्त्याचा वापर दररोज मरीन लाईन्स रेल्वे स्टेशनला उतरणारे हजारो प्रवासी करतात. पण झाडाची मोठी फांदी पडली त्यावेळी येथून कोणी जात नव्हते, म्हणून सुदैवाने यात कोणीही जखमी झाले नाही.
ठाणे, कल्याण- डोंबिवलीमध्येही मुसळधार
ठाणे, कल्याण - डोंबिवली या भागालाही पावसाने अक्षरश: झोडपले. तासभर मुसळधार पाऊस कोसळल्याने काही भागांमध्ये पाणी तुंबले. यामुळे नालेसफाईच्या कामावरही अनेकांनी सोशल मीडियावर संताप व्यक्त केला.
मे महिन्यात जास्त पावसाची शक्यता
आयएमडी म्हणजेच भारताच्या हवामानशास्त्र विभागाने नुकताच अंदाज जाहीर केला होता. यात मे महिन्यात महाराष्ट्रात सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडणार असल्याचा अंदाज वर्तवला होता.