mumbai tet paper leak main accused virendra gupta arrested in bihar
पुढारी ऑनलाईन : राज्यात गाजत असलेल्या TET (शिक्षक पात्रता परीक्षा) पेपर लीक प्रकरणात पोलिसांना मोठे यश मिळाले आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपी वीरेंद्र कुमार गुप्ता याला अखेर बिहारमधून अटक करण्यात आली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून पोलिसांकडून त्याचा शोध सुरू होता. भिवंडी पोलिसांच्या विशेष पथकाने बिहारमध्ये मोहीम राबवत ही कारवाई केली.
मिळालेल्या माहितीनुसार, अटकेनंतर वीरेंद्र कुमार गुप्ता याला बिहारमधून विमानाने पुणे विमानतळावर आणण्यात आले आहे. तेथून कडेकोट सुरक्षा व्यवस्थेत त्याला भिवंडीत आणले जाणार आहे. त्यानंतर त्याला न्यायालयात हजर केले जाण्याची शक्यता आहे.
TET पेपर लीक प्रकरणात वीरेंद्र कुमार गुप्ता याची भूमिका अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे. त्याची चौकशी केल्यानंतर संपूर्ण पेपर लीक नेटवर्क, यामध्ये सहभागी असलेले इतर आरोपी, आर्थिक व्यवहार आणि या कटाशी संबंधित अनेक महत्त्वाचे खुलासे होण्याची शक्यता तपास यंत्रणांना आहे.
भिवंडी पोलिसांच्या या कारवाईमुळे TET पेपर लीक प्रकरणाच्या तपासाला नवी गती मिळण्याची अपेक्षा आहे. तसेच, या प्रकरणात सहभागी असलेल्या इतर संशयितांविरोधातही लवकरच कारवाई होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.