मुंबई: महाराष्ट्र आणि गुजरातच्या किनारपट्टीवरील हवामानात अनेक बदल होण्याची शक्यता असून, येत्या 14 वर्षांत मुंबई उपनगरातील उन्हाळी कमाल तापमान सुमारे 13.0 अंश सेल्सियसने वाढू शकते असा अंदाज बंगळुरातील अझीम प्रेमजी विद्यापीठाच्या इंडियन कोस्टल रिजन: क्लायमेट प्रोजेक्शन्स 2021-2040 या अहवालात मांडण्यात आला आहे.
या हवामान बदलांमुळे पुढील दीड दशकात किनारपट्टीवर राहणाऱ्या लोकांचे जीवन, त्यांचा व्यवसाय यात मोठे बदल होतील, असेही हा अहवाल सांगतो. अझीम प्रेमजी विद्यापीठाच्या स्कूल ऑफ क्लायमेट चेंज शाखेचेे प्रोफेसर शांतनु गोस्वामी यांनी शुक्रवारी प्रेस क्लबमध्ये माध्यमांशी संवाद साधत या अहवालातील ठळक मुद्दे स्पष्ट केले.
या अहवालात वर्ष 2040 पर्यंतच्या विशिष्ट हवामान बदलांवर लक्ष केंद्रित केले गेले आहे. केरळमध्ये वाढणारे तापमान किंवा महाराष्ट्रात मान्सूनने धारण केलेले रौद्र रूप याचा अभ्यास केला असता पारंपरिक हवामान बदलाच्या ज्ञानप्रणाली अविश्वसनीय ठरत असल्याचे त्यांचे म्हणणे आहे.
भारतात किनारपट्टीवर होणाऱ्या बदलाचे सर्वाधिक परिणाम महाराष्ट्र आणि गुजरातच्या किनारपट्टीवर दिसायला सुरुवात झाल्याचे प्रो. गोस्वामी म्हणाले.
गेल्या पाच वर्षात महाराष्ट्रात मान्सून पावसाच्या प्रमाणात लक्षणीय वाढ होत आहे. किनारपट्टीलगत असलेल्या मुंबई उपनगरामध्ये पावसाचे स्वरूप बदलले असून पुढील काळातील सर्व पावसाळ्यांत मुसळधार पावसाचे दिवस एका आठवड्याने म्हणजे 6 दिवसांनी वाढण्याची शक्यता आहे.
भविष्यात सुरत आणि भावनगरसारख्या जिल्ह्यांमध्ये अनुक्रमे 23% आणि 24% अधिक तीव्र नैऋत्य मान्सूनच्या लाटांचा सामना करावा लागू शकतो. केरळ आणि तामिळनाडू किनारपट्टी भागांमध्ये सुद्धा आद्रता आणि उष्णता अधिक असू शकते.
ही उष्णता मानवी आरोग्यास धोकादायक अंश सेल्सियस पर्यंत पोहोचण्याची शक्यताही या अहवालात व्यक्त करण्यात आली आहे. मुंबई उपनगरातील उन्हाळी कमाल तापमानात सुमारे 13.0 अंश सेल्सियस इतकी वाढ होऊ शकते.
जी मुंबईकरांच्या आरोग्यावर घातक परिणाम करणारी ठरेल. या बदलत्या उष्णतेचा सामना करण्यासाठी शासन,राज्यकर्ते, मीडिया, कार्यकर्ते आणि पर्यावरण तज्ञ यांनी एकत्र मिळून कृती आरखडा तयार करणे गरजेचे आहे. विशेषतः मुंबईतील बांधकाम धोरणात आणि रस्ते बांधणीत या अभ्यासाचा विचार व्हायला हवा असे प्रा. गोस्वामी यांनी सूचवले.
किनारपट्टीवर राहणाऱ्या लोकांवर मोठा परिणाम
तापमान बदलाचा भारतीय किनारपट्टीवर राहणाऱ्या लोकांच्या उपजीविकेवर मोठा परिणाम होईल, असे हा अभ्यास सांगतो.
उदाहरणार्थ, मुंबईतील कोळीवाड्यात कोळंबी वाळवण्याची परंपरा होती. अनियमित पावसामुळे कोळंबी वाळवण्याची ही प्रक्रिया विस्कळीत झाली आहे. जवळा, बोंबील सुकवून उदरनिर्वाह करणाऱ्या कोळ्यांचे मोठे नुकसान होत आहे.
गोव्यात अवेळी पडणाऱ्या पावसामुळे काही तासात मिठाच्या उत्पादनाचे मोठे नुकसान होऊन मीठ उद्योग धुळीस लागला आहे.
तापमान वाढीमुळे मासे समुद्रात अधिक खोलवर गेल्याने छोटेखानी मच्छिमारांना ‘रिकामेच जाळे’ घेऊन यावे लागत आहे. असे अनेक परिणाम किनारपट्टी भागातील लोकांच्या जीवनावर होणार आहेत.
पुढील 14 वर्षात किनारपट्टी भागातील हवामान आणि जीवनमान खूपच बदलेले असेल आणि विशेष म्हणजे हवामान बदलाशी जुळवून घेण्यासाठी फार कमी कालावधी हाती आहे, असा इशाराही अहवालात देण्यात आला आहे.
किनारपट्टीवरील सरासरी 40 जिल्ह्यांमध्ये उन्हाळ्यातील तापमानात अंदाजे 1 अंशसेल्सिअसपेक्षा जास्त वाढलेले असेल.
महाराष्ट्र आणि गुजरात किनारी भागांमध्ये पावसाचे प्रमाण वाढण्याची शक्यता आहे.
मुंबई उपनगरामध्ये मुसळधार पावसाचा कालावधी एका आठवड्याने वाढू शकतो.
समुद्राच्या पृष्ठभागावर तापमान 0.27 अंश सेल्सिअस वाढल्यास चक्रीवादळांची शक्यता आणि वारंवारिता वाढणार.