India’s Rouble Nagi Wins Global Teacher Prize: मुंबईतल्या झोपडपट्ट्यांमध्ये फिरत मुलांना शिक्षण देणाऱ्या एका शिक्षिकेचं काम आज थेट जागतिक पातळीवर पोहोचलं आहे. सामाजिक कार्यकर्त्या आणि शिक्षिका रुबल नागी यांना दुबईमध्ये प्रतिष्ठित Global Teacher Prize देऊन सन्मानित करण्यात आलं आहे. या पुरस्कारासोबत त्यांना तब्बल 10 लाख अमेरिकन डॉलर्स (सुमारे 9 कोटी रुपये) देण्यात आले आहेत.
हा सन्मान दुबई येथे झालेल्या World Governments Summit मध्ये प्रदान करण्यात आला. तब्बल 139 देशांमधील जवळपास 5 हजार शिक्षकांमधून रुबल नागी यांची निवड करण्यात आली.
24 वर्षांपूर्वी अवघ्या 30 मुलांपासून सुरू झालेला हा प्रवास आज दहा लाखांहून अधिक मुलांपर्यंत पोहोचला आहे. झोपडपट्ट्या, दुर्गम भाग, दुर्लक्षित वस्ती, जिथे शाळा पोहोचणं अवघड आहे, तिथे रुबल नागी यांनी शिक्षण पोहचवलं. त्यांच्या संस्थेमार्फत देशभर 800 हून अधिक शिकवणी केंद्रं सुरू करण्यात आली आहेत. भिंतींवर गणित, विज्ञान, भाषा आणि इतिहास शिकवणारी चित्रं काढून त्यांनी शिक्षणाची नवी पद्धत लोकांसमोर आणली.
पुरस्कार स्वीकारताना त्या भावुक झाल्या होत्या. “हे माझ्यासाठी केवळ वैयक्तिक यश नाही. भारतातील प्रत्येक मूल शाळेत जावं, हे माझं स्वप्न आहे. गेली दोन दशके मी दररोज हेच ध्येय डोळ्यांसमोर ठेवून काम करत आहे,” असं त्या म्हणाल्या.
हा पुरस्कार वर्की फाउंडेशन कडून दिला जातो. संस्थेचे संस्थापक सनी वर्की यांनी रुबल नागी यांच्या कार्याचं विशेष कौतुक केलं. समाजातील शेवटच्या घटकापर्यंत शिक्षण पोहोचवण्याचं धाडस त्यांनी दाखवलं असल्याचं त्यांनी सांगितलं.
रुबल नागी यांनी ‘मिसाल इंडिया’ आणि ‘मिसाल मुंबई’सारखे उपक्रम राबवून शिक्षणासोबत स्वच्छता, पिण्याचं पाणी, जीवनकौशल्य आणि व्यावसायिक प्रशिक्षण यावरही भर दिला. हजारो घरं रंगवणं, स्वच्छता मोहिमा राबवणं आणि मुलांमध्ये आत्मविश्वास निर्माण करणं, असा सर्वांगीण दृष्टिकोन त्यांच्या कामात दिसतो.
पुरस्कारातून मिळालेली रक्कम त्या आता मोफत व्यावसायिक प्रशिक्षण देणारी संस्था उभारण्यासाठी वापरणार आहेत, ज्यामुळे गरजू तरुणांना रोजगाराच्या संधी मिळतील.
UNESCO च्या शिक्षण विभागानेही या यशाचं स्वागत करत “शिक्षक एखाद्या मुलाचं आयुष्य बदलू शकतो, याचं हे उत्तम उदाहरण आहे,” असं म्हटलं आहे.
मुंबईच्या गल्ल्यांमध्ये सुरू झालेला हा शिक्षणाचा प्रवास आज जागतिक व्यासपीठावर पोहोचला आहे. ही केवळ एका शिक्षिकेची यशोगाथा नाही, तर तळागाळातील शिक्षणाला मिळालेली आंतरराष्ट्रीय दाद आहे.