मुंबई: दादरमधील एका उच्चभ्रू शाळेतील शिक्षिका आणि अल्पवयीन विद्यार्थ्याच्या खळबळजनक प्रेम प्रकरणात आता एक नवा आणि अनपेक्षित ट्विस्ट आला आहे. अटकेत असलेल्या शिक्षिकेने जामिनासाठी अर्ज केला असून, त्यात तिने धक्कादायक दावा केला आहे.
"विद्यार्थीच माझ्या प्रेमात होता आणि आम्ही एका व्हर्च्युअल रिलेशनशिपमध्ये होतो," असे तिने म्हटले आहे. आपल्या दाव्याच्या समर्थनार्थ तिने न्यायालयात दोघांमधील व्हॉट्सॲप चॅट्स आणि ईमेल सादर केले आहेत, ज्यामुळे या प्रकरणाला पूर्णपणे नवे वळण लागले आहे.
अल्पवयीन मुलावर लैंगिक अत्याचार केल्याच्या (पोक्सो) आरोपाखाली अटकेत असलेल्या शिक्षिकेने आपल्या जामीन अर्जात संपूर्णपणे वेगळी कहाणी मांडली आहे. तिच्या म्हणण्यानुसार, विद्यार्थी तिच्यावर प्रेम करत होता आणि तोच तिला सातत्याने मेसेज आणि ईमेल पाठवत असे. तिने सादर केलेल्या पुराव्यांनुसार, विद्यार्थ्याने तिला 'पत्नी' आणि 'सर्वस्व' संबोधले होते.
विद्यार्थ्याचा मेसेज (२८ फेब्रुवारी २०२४): "तू माझी पत्नी आहेस, माझं जग आहेस, माझं सर्वस्व आहेस...", विद्यार्थ्याचा दुसरा मेसेज: "मी मरेन... तुला न भेटता/मिठी मारल्याशिवाय." विद्यार्थ्याचे ईमेल: पालकांनी फोन काढून घेतल्यानंतर विद्यार्थ्याने ईमेलवर संपर्क साधल्याचे शिक्षिकेचे म्हणणे आहे. एका ईमेलमध्ये तो लिहितो, "तू माझ्यापासून शारीरिकरित्या दूर जाताना पाहून माझं मन दुखतंय... मी तुझ्यावर खूप प्रेम करतो आणि तू माझ्यापासून दूर असणं किंवा माझ्याशी बोलत नसणं मला सहन होत नाही." एका हस्तलिखित चिठ्ठीत विद्यार्थ्याने स्वतःला 'किकीचा नवरा' (किकी हे शिक्षिकेचे टोपणनाव असावे) असे संबोधल्याचा दावाही करण्यात आला आहे.
दुसरीकडे, पीडित विद्यार्थ्याच्या कुटुंबीयांनी दाखल केलेल्या एफआयआरनुसार, या प्रकरणाची सुरुवात २०२३ मध्ये झाली, जेव्हा मुलगा ११ वीत होता. नाटकाच्या सरावाच्या निमित्ताने ओळख झाल्यानंतर शिक्षिकेनेच मुलाशी जवळीक साधण्याचा प्रयत्न केला. वारंवार नकार देऊनही तिने कॉल आणि मेसेजद्वारे त्याचा पाठलाग केला. १२ डिसेंबर २०२३ रोजी, गाडीत बसवून निर्जन ठिकाणी नेऊन तिने मुलाच्या जवळ जाण्याचा प्रयत्न केला. एफआयआरमध्ये असाही गंभीर आरोप आहे की, शिक्षिकेने मुलाला काही गोळ्या दिल्या, ज्या खाल्ल्यानंतर त्याला संकोच वाटेनासा झाला. त्यानंतर २४ जानेवारी २०२४ रोजी गाडीत आणि नंतर हॉटेलमध्येही शिक्षिकेने मुलावर लैंगिक अत्याचार केले. याबद्दल कोणाला सांगितल्यास जीवन संपवण्याचे किंवा करिअर उद्ध्वस्त करण्याची धमकीही तिने दिली होती, असे एफआयआरमध्ये म्हटले आहे.
२५ जून रोजी शिक्षिकेने तिच्या मोलकरणीला मुलाच्या घरी पालकांचे नंबर घेण्यासाठी पाठवले. त्यानंतर पालकांनी मुलाला विश्वासात घेऊन विचारपूस केली असता, त्याने घडलेला सर्व प्रकार सांगितला. यानंतर २८ जून रोजी एफआयआर दाखल करण्यात आला आणि दुसऱ्याच दिवशी शिक्षिकेला अटक करण्यात आली. एकीकडे विद्यार्थ्याच्या कुटुंबीयांचे गंभीर आरोप आणि दुसरीकडे शिक्षिकेने सादर केलेले पुरावे, यामुळे या प्रकरणाला एक नवे आणि गुंतागुंतीचे वळण मिळाले आहे. आता न्यायालय या दोन्ही बाजू तपासल्यानंतर काय निर्णय देणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.