

Haldiram Nagpur news
नागपूर: प्रसिद्ध खाद्यपदार्थ कंपनी 'हल्दीराम'चे मालक आणि नागपुरातील उद्योगपती कमल अग्रवाल यांची तब्बल ९ कोटी ३८ लाख रुपयांनी फसवणूक झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. गुंतवणुकीच्या बदल्यात कंपनीत ७६ टक्के मालकी हक्क (शेअर्स) देण्याचे आमिष दाखवून मुंबईतील एका व्यावसायिक दाम्पत्याने हा गंडा घातला आहे. याप्रकरणी अग्रवाल यांच्या तक्रारीवरून नागपुरातील कळमना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, हल्दीराम समूहाची उपकंपनी असलेल्या ओम इंडस्ट्रीज लिमिटेडने मुंबईस्थित 'रॉयल ड्रायफ्रूट प्रायव्हेट लिमिटेड' या कंपनीत गुंतवणूक करण्याचा निर्णय घेतला होता. यावेळी 'रॉयल ड्रायफ्रूट'चे मालक समीर अब्दुल हुसेन लालानी आणि त्यांची पत्नी हिना लालानी यांनी कमल अग्रवाल यांना त्यांच्या कंपनीतील ७६ टक्के शेअर्स देण्याचे आश्वासन दिले होते.
या करारानुसार, कमल अग्रवाल यांच्या कंपनीने सप्टेंबर २०२३ पर्यंत टप्प्याटप्प्याने एकूण ९ कोटी ३८ लाख ५९ हजार रुपयांची गुंतवणूक केली. मात्र, गुंतवणूक करूनही लालानी दाम्पत्याने अग्रवाल यांना ना कंपनीच्या नफ्यातील वाटा दिला, ना कबूल केल्याप्रमाणे शेअर्स नावावर केले. समीर लालानी, त्यांची पत्नी हिना, मुलगा आलिशान लालानी आणि त्यांचा सहकारी प्रकाश भोसले हे विविध कारणे सांगून वेळोवेळी दिशाभूल करत होते.
अखेरीस फसवणूक झाल्याचा संशय आल्याने हल्दीराम कंपनीने 'रॉयल ड्रायफ्रूट' कंपनीच्या कागदपत्रांची आणि आर्थिक व्यवहारांची अंतर्गत चौकशी केली. या चौकशीत धक्कादायक माहिती समोर आली. आरोपींनी बनावट कागदपत्रांच्या आधारे कंपनीची वार्षिक उलाढाल आणि नफा अनेक पटींनी फुगवून दाखवला होता. केवळ गुंतवणुकीच्या उद्देशाने ही दिशाभूल करण्यात आल्याचे स्पष्ट होताच कमल अग्रवाल यांनी पोलिसांत धाव घेतली.
"या प्रकरणी कमल अग्रवाल यांनी पोलिसात तक्रार दाखल करताच आरोपी लालानी दाम्पत्य आणि त्यांचा मुलगा फरार झाले आहेत," अशी माहिती कळमना पोलीस ठाण्याचे निरीक्षक प्रवीण काळे यांनी दिली. पोलिसांच्या प्राथमिक तपासात आरोपींच्या कंपनीविरोधात इतरही अनेक आर्थिक फसवणुकीच्या तक्रारी आणि चौकशा प्रलंबित असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे या प्रकरणात आणखी काही जणांची फसवणूक झाल्याची शक्यता वर्तवण्यात येत असून, पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत.