Mumbai Taj Hotel bomb threat File Photo
मुंबई

Mumbai News: “ताज हॉटेलमध्ये दाऊदने बॉम्ब ठेवलाय”; मध्यरात्री नियंत्रण कक्षात फोन खणखणताच पोलिसांची धावपळ, तपासात काय उघड?

Mumbai Taj Hotel bomb threat: मुंबईतील ताज हॉटेल बॉम्बने उडवून देण्याची धमकी मध्यरात्री एका अज्ञात फोनद्वारे देण्यात आली.

पुढारी वृत्तसेवा

Mumbai Taj Hotel bomb threat

मुंबई: मुंबईतील ताज हॉटेल बॉम्बने उडवून देण्याची धमकी मध्यरात्री एका अज्ञात फोनद्वारे देण्यात आली. या धमकीच्या फोनमुळे मुंबई आणि नवी मुंबई पोलीस दलात प्रचंड खळबळ उडाली.

माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ हॉटेलमध्ये धाव घेत शोधमोहीम राबवली. मात्र, सखोल तपासणीत कोणतीही संशयास्पद वस्तू किंवा स्फोटक आढळून आले नाही. प्राथमिक तपासात हा फोन एक बनावट धमकी असल्याचे निष्पन्न झाले आहे.

'दाऊदने बॉम्ब ठेवलाय'; मध्यरात्री आला फोन

मिळालेल्या माहितीनुसार, रात्री सुमारे १२.१३ वाजता नवी मुंबई पोलीस नियंत्रण कक्षाला एका व्यक्तीने फोन करून, “दाऊदने ताज हॉटेलमध्ये बॉम्ब ठेवला आहे,” अशी माहिती दिली. त्यानंतर ही माहिती तातडीने मुंबई पोलीस मुख्य नियंत्रण कक्षाला देण्यात आली. सूचना मिळताच कुलाबा पोलीस, गुन्हे शाखेचे पथक आणि बॉम्ब शोधक व नाशक पथक ताज हॉटेलमध्ये दाखल झाले. हॉटेलची मुख्य लॉबी, स्विमिंग पूल, विविध हॉल, रेस्टॉरंट्स, पार्किंग, बाहेरील परिसर तसेच इतर संवेदनशील ठिकाणी कसून तपासणी करण्यात आली. संपूर्ण शोधमोहीम पूर्ण झाल्यानंतर हॉटेल परिसरात कोणतेही स्फोटक किंवा संशयास्पद साहित्य आढळले नाही.

प्राथमिक तपासात ही बॉम्बची धमकी बनावट असल्याचे स्पष्ट झाले. तांत्रिक तपासात हा धमकीचा फोन नवी मुंबईतील तुर्भे परिसरातून करण्यात आल्याचे निष्पन्न झाले आहे. संबंधित मोबाईल क्रमांकाच्या आधारे फोन करणाऱ्याची ओळख पटवून त्याला अटक करण्यासाठी पोलीस शोध घेत असून, तुर्भे पोलिसांच्या मदतीने पुढील तपास सुरू आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT