Mumbai sugar price hike pudhari photo
मुंबई

Mumbai sugar price hike : साखर कडाडली!

@६० ते ८० रुपये प्रतिकिलो

पुढारी वृत्तसेवा

मुंबई / पुणे : साखरेचे दर मुंबईत एपीएमसीच्या घाऊक बाजारात ६५ रुपये तर किरकोळ बाजारात ७५ ते ८० रुपयांवर पोहोचले असून, गेल्या दीड महिन्यांत साखर किलोमागे घाऊक बाजारात २२ रुपयांनी कडाडली आहे.

ऐन सणासुदीच्‍या उंबरठ्यावर साखरेच्‍या दराने उंची गाठल्‍याने सर्वसामान्‍यांचे कौटुंबिक बजेट ढासळले असून, आगामी काळात हे दर आणखी वाढण्‍याच्‍या शक्‍यतेने सामान्‍यांची चिंता अधिकच वाढली आहे. गेल्‍या ५० दिवसांत किरकोळ बाजारातील साखरेचे दर किलोमागे तब्‍बल १९ टक्‍क्‍यांनी वाढले आहेत.

सणासुदीच्‍या काळात भडकलेले साखरेचे दर नियंत्रणात आणण्‍यासाठी केंद्र सरकारने ग्राहकांना दिलासा देण्‍याचा प्रयत्‍न केला. यात केवळ १५ दिवस साखरेचा साठा करण्‍याचे निर्बंध घालतानाच एकात्मिक दर कोट्यांतर्गत १० लाख मेट्रिक टन कच्‍च्‍या साखरेची आयात ३१ ऑक्टोबरपर्यंत करमुक्‍त करण्‍याचा निर्णय सरकारने गुरुवारी (दि. २०) घेतला. तद्‍नंतरही शुक्रवारी बाजारात साखरेच्‍या दरात वाढच होत असल्याचे दिसते.

सांगली, बुलडाणा, वाशिम या तीन जिल्‍ह्यांत उच्‍च प्रतीच्‍या साखरेचा दर किलोला ८० रुपये होता. कोल्‍हापुरातही या प्रतीची साखर ७५ ते ७८ रुपये किलोने विक्री होत होती. अन्‍य जिल्‍ह्यांतही साखर प्रतीनुसार ६० ते ७५ रुपये किलो या दराने विक्री सुरू आहे.

शुगर मर्चंट असोसिएशनचे अध्यक्ष अशोक जैन यांनी पुढारीला सांगितले की, साखर कडाडणार याची पूर्वकल्पना आम्ही केंद्र सरकारला एप्रिलमध्येच दिली होती. गेल्या दहा ऑगस्टलाही केंद्राला आम्ही पत्र पाठवले. त्यामुळे सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्यात साखरेचे दर स्थिर राहतील. त्यासाठी केंद्र सरकार आणि राज्य सरकारकडून हालचालींना वेग आला आहे, असे ते म्हणाले.

साठेबाजी, कमी उत्पादनामुळे साखर महागली

साखरेच्‍या वाढत्‍या दरासाठी केवळ इथेनॉलला जबाबदार धरणे चूक असल्‍याचे केंद्र सरकारने स्‍पष्‍ट केले आहे. साखरेच्‍या महागाईसाठी कमी उत्‍पादन, सणासुदीमुळे वाढलेली मागणी, हवामानामुळे ऊस पिकाला बसलेला फटका, जागतिक बाजारपेठेत पुरवठ्यातील कमतरता, काही व्‍यापार्‍यांकडून साठेबाजी अशी कारणे जबाबदार असल्‍याचे सरकारने म्‍हटले आहे. इथेनॉल निर्मितीसाठी वापरण्‍यात येणार्‍या साखरेचा टक्‍का गेल्‍या काही वर्षांत घटला आहे, असेही केंद्रीय ग्राहक मंत्रालयाने स्‍पष्‍ट केले आहे.

मिठाई, चहा महागणार

सध्‍या सणासुदीच्‍या पार्श्वभूमीवर मिठाई तयार करण्‍याचे काम सुरू आहे. मात्र, साखरेचे दर वाढल्याने आता मिठाई विक्रेत्यांच्या खर्चाचा ताळमेळ बिघडला आहे. साखरेच्‍या दरवाढीचा परिणाम म्‍हणून यंदा मिठाई महागण्‍याचे संकेत मिळत आहेत. उत्पादन खर्च वाढल्यास मिठाईचे दर वाढवण्याशिवाय पर्याय नसल्याचे विक्रेत्यांचे म्हणणे आहे. सोबतच साखर दरवाढीचा चटका बाजारात चहा, कॉफी पिणार्‍यांनाही सहन करावा लागण्‍याची शक्‍यता आहे.

मुंबईकरांना फटका

साखर जाड, मध्यम आणि बारीक अशा तीन प्रकारात मोडते. हे तिन्ही प्रकार महागले आहेत. मुंबईसह उपनगरात दररोज १५० गाडी साखर लागते. एक गाडी दहा टनाची असते. यावरून मुंबईकरांना साखर महागाईचा बसणारा फटका लक्षात यावा.

इतिहासात सर्वात मोठी दरवाढ

गुरुवारी साखरेचे घाऊक दर क्विंटलमागे ६ हजार ७०० ते ६ हजार ८०० रुपयांवर पोहोचले होते. आत्तापर्यंतच्या इतिहासातील सर्वात मोठी वाढ आहे.

गूळही महागला

साखरेसोबत गुळाच्या दरातही वाढ झाली आहे. गूळही ३८ ते ४० रुपये किलो वरुन एपीएमसीत ६५ रुपये किलोपर्यंत पोहचला आहे. गेल्या वीस दिवसात गुळाच्या दरात किलोमागे तब्बल २५ रुपयांची वाढ झाली आहे. सध्या गूळही किरकोळ बाजारात साखरेबरोबर ७५ ते ८० रुपये किलो विकला जात आहे.

किरकोळ बाजारात साखर

  • १ ते ५ ऑगस्ट ४९ ते ५० रुपये किलो

  • १० ते १५ ऑगस्ट ६० ते ६२ रुपये किलो

  • १९ ते २० ऑगस्ट ७५ ते ८० रुपये किलो

एपीएमसीतील साखरेचे दर

  • जून ३९ ते ४० रुपये किलो

  • जुलै ५३ ते ५४ रुपये किलो

  • ऑगस्ट ६५ ते ७० रुपये किलो

  • २१ ऑगस्ट दर घसरले ६१ ते ६५ रुपयांपर्यंत

आम्‍ही सरकारसोबत : ‘इस्मा’

साखरेचे दर नियंत्रणात ठेवण्‍यासाठी सरकारने चांगले निर्णय घेऊन सट्टेबाजी व कृत्रिम दरवाढ खपवून घेणार नसल्‍याचा स्पष्ट संदेश दिला आहे. आम्‍ही सरकारने घेतलेल्‍या निर्णयांसोबत असून सध्याची दरवाढ बाजारातील मूलभूत घटकांमुळे नाही, तर सण-उत्सव जवळ आल्याने सट्टेबाजी व घाईच्‍या खरेदीमुळे झाली आहे. सध्‍या देशात साखरेचा तुटवडा नाही, असे ‘इंडियन शुगर अँड बायो एनर्जी मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन’ (इस्मा) ने म्हटले आहे.

अचानक दरवाढ संशयास्पद : शेट्टी

साखरेच्या दरात अचानक आलेली तेजी संशयास्‍पद असून, या दरवाढीने शेतकर्‍यांना नाही तर व्‍यापार्‍यांना फायदा होईल, असा आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी यांनी केला. यंदाच्या हंगामातील साखरेचा साठा दिवाळीपर्यंत पुरणारा आहे आणि पुढील उत्पादनही देशाला पुरेल एवढे असताना अचानक दर कसे काय वाढले, असा प्रश्‍न त्‍यांनी केला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT