मुंबई : दिल्लीतील भटक्या कुत्र्यांना आश्रयस्थानात ठेवण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिल्यानंतर मुंबईतील भटक्या श्वानांच्या बंदोबस्ताची मागणी आता मुंबईकर करीत आहेत. मागील पंधरा वर्षांत १२ लाख ७३ हजार तर २०२४ मध्ये १ लाख ३५ हजार २५३ मुंबईकरांना भटक्या श्वानांनी चावा घेतला आहे. त्यामुळे भटक्या श्वानांचे निर्बीजीकरण करून त्यांनाही आश्रयस्थानात हलवण्याची मागणी होत आहे.
२०१४ च्या गणनेनुसार मुंबईत ९५ हजार १७४ भटके श्वान होते. त्यामुळे गेल्या अकरा वर्षात मुंबईतील भटक्या श्वानांची संख्या लाखांत गेली आहे. मुंबईत गेल्या २२ वर्षांत १६ लाख ६० हजार भटक्या श्वानांचा प्रश्न कायम असून, त्यावर अद्याप प्रभावी नियंत्रण मिळवण्यात अपयश आले आहे. दरवर्षी मुंबई महानगरपालिका या भटक्या श्वानांची नसबंदी करत असते. मात्र दर पावसाळ्यात हा प्रश्न ऐरणीवर येत असतो. भटक्या कुत्र्यांकडून बालके, ज्येष्ठ नागरिक आणि दुचाकीस्वार यांच्यावर पाठलाग करत हल्ल्यांच्या घटनांमध्ये कमालीची वाढ झाली. भटक्या कुत्र्यांची समस्या नियंत्रणाबाहेर जाण्यापूर्वीच पालिकेने उपाय करण्याची मागणी होत आहे.
मुंबई पालिकेचे आयुक्त भूषण गगराणी यांना आमदार अमित साटम यांनी पत्र पाठवले असून मुंबईतील भटक्या कुत्र्यांच्या नसबंदी करून त्यांच्यासाठी आश्रयस्थाने तयार करुन तेथे स्थलांतरीत करावे, अशी मागणी केली आहे. यामुळे कुत्र्यांकडून हल्ले होण्याच्या घटना कमी होतील आणि सार्वजनिक सुरक्षेची वाढती चिंता कमी होण्यास मदत होईल, असा दावाही त्यांनी केला. शहरात 'रेबीज' प्रतिबंधक विरोधी लसींचा तुटवडा असल्याचेही त्यांनी पत्रात म्हंटले आहे.
2020 : 53,015
2021: 61,332
2022 : 79,252
2023 : 1,06,797
2024 : 1,35,253
2007 सालच्या जनगणनेनुसार मुंबईत ७४ हजार ७६१ भटके श्वान होते, तर २०१४ मध्ये हा आकडा ९५ हजार १७२ झाला.
2009 ते २०२४ या कालावधीत भटक्या श्वानांच्या नियंत्रणासाठी २४ कोटी ३ लाख २७हजार रुपये खर्च करण्यात आले आहेत.
नवी मुंबई : नवी मुंबईतही भटक्या श्वानांची दशहत वाढली आहे. जानेवारीपासून जुलै अखेरपर्यंत शहरात सात महिन्यात ६,९३९ जणांना त्यांनी चावा घेतला आहे. त्यामुळे या श्वानांचा बंदोबस्त करावा अशी मागणी नवी मुंबईकर करीत आहेत.
दिघा, ऐरोली व घणसोली विभागात दहशत अधिक आहे. अलिडकेच दिघा येथे एका लहान मुलाचे भटक्या श्वानाने भरदिवसा लचके तोडले आहेत. ऐरोली सेक्टर १, २, ३, ४, ५, १६, १७,२०, पटनी कंपनी परिसर, गणपती पाडा, दिघा, एमआयडीसीतील यादव नगर, इलठण पाडा, घणसोली, गोठिवली परिसरात रात्रीच्या वेळी कुत्र्यांचे कळप फिरताना दिसत आहेत. वाहनचालकांचा ते पाठलाग करीत आहेत. रात्री उशीरा घरी येणाऱ्यांच्या मनात भटक्या कुत्र्यांची दहशत वाढली आहे. महापालिकेकडून श्वानांच्या निर्बीजीकरणाकडे दुर्लक्ष झाल्याने ही समस्या गंभीर झाल्याचा आरोपही होत आहे.