

लासलगाव (नाशिक) : येथील गणेशनगर परिसरात मोकाट कुत्र्यांनी धुमाकूळ घातला आहे. सोमवारी (दि. ११) दुपारी आरोही विशाल जाधव या तीनवर्षीय चिमुकलीवर भटक्या कुत्र्यांच्या टोळीने हल्ला केल्याने एकच खळबळ उडाली. चिमुकलीची आरडाओरड ऐकून परिसरातील नागरिकांनी धाव घेत तिची कुत्र्यांच्या तावडीतून सुटका केली. त्यानंतर तिला तत्काळ लासलगाव ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. रेबीजचे इंजेक्शन दिल्यानंतर तिला पुढील उपचारासाठी नाशिक जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले.
लासलगाव परिसरात मोकाट कुत्र्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून, वारंवार हल्ल्याच्या घटना घडत आहेत. ग्रामसेवक आणि ग्रामपंचायतीला नागरिकांनी लेखी निवेदन दिले आहे. मात्र, आजवर कोणतीही ठोस कार्यवाही झालेली नाही. परिणामी लहान मुले, महिला आणि वृद्ध नागरिक भीतीच्या सावटाखाली आहेत.
मोकाट कुत्र्यांचे निर्बीजीकरण व लसीकरण तातडीने राबवावे.
शहरी वस्तीमध्ये कुत्रे पकड मोहीम सतत सुरू ठेवावी.
नागरिकांनी रस्त्यावर अन्न देणे टाळावे, जेणेकरून कुत्र्यांचा वावर कमी होईल.
लहान मुलांना आणि वयोवृद्धांना एकटे रस्त्यावर पाठवू नये.
मुलांना गल्लीबोळात भटक्या कुत्र्यांच्या जवळ जाण्यापासून रोखावे.
घटनेनंतर तत्काळ जखमीला रुग्णालयात दाखल करून अँटी-रेबीज लस द्यावी.