मुंबई : सोशल मीडियावर कथितरित्या अश्लील, आक्षेपार्ह आणि सार्वजनिक सभ्यतेला बाधा आणणारा मजकूर प्रसारित केल्याप्रकरणी महाराष्ट्र सायबर विभागाने स्टँड-अप कॉमेडियन प्रणित मोरे, हिमांशू जांग्रा, डॉ. सेजल पवार आणि अन्य संबंधितांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी सायबर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (BNS) तसेच माहिती तंत्रज्ञान कायद्यातील विविध कलमांन्वये एफआयआर नोंदविण्यात आला आहे.
महाराष्ट्र सायबरच्या माहितीनुसार, संबंधित आक्षेपार्ह मजकूर प्रणित मोरे यांच्या स्टँड-अप कार्यक्रमाशी संबंधित असून तो YouTube, Instagram आणि इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर प्रसारित करण्यात आला होता.
तपासादरम्यान समोर आलेल्या एका व्हायरल व्हिडीओ क्लिपमध्ये हिमांशू जांग्रा यांनी डेटवर खर्च केलेल्या पैशांच्या बदल्यात शारीरिक संबंधांचा हक्क असल्याचे सूचित करणारी टिप्पणी केल्याचा आरोप आहे. या प्रकारची विधाने महिलांचा अवमान करणारी असून संमती, सन्मान आणि लैंगिक संवेदनशीलतेसारख्या गंभीर सामाजिक मुद्द्यांचं गांभीर्य कमी करणारी आहेत, असे मत अनेकांनी व्यक्त केले होते.
तसेच दुसऱ्या एका क्लिपमध्ये डॉ. सेजल पवार यांनी मृत व्यक्तींचे मृतदेह आणि वैद्यकीय शिक्षणासाठी वापरल्या जाणाऱ्या कॅडेव्हर्स संदर्भात कथितरित्या अश्लील आणि अवमानकारक टिप्पणी केल्याचा आरोप करण्यात आला आहे. या वक्तव्यांमुळे मृत व्यक्तींच्या सन्मानाला धक्का पोहोचल्याचे तसेच सार्वजनिक सभ्यतेच्या निकषांचे उल्लंघन झाल्याचे महाराष्ट्र सायबरचे म्हणणे आहे.
सायबर विभागाच्या प्राथमिक तपासानुसार, संबंधित मजकूर जाणीवपूर्वक रेकॉर्ड करून तो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात प्रसारित करण्यात आला. प्रेक्षकसंख्या वाढविणे, अधिक एंगेजमेंट मिळविणे आणि आर्थिक लाभ मिळविण्याच्या उद्देशाने हा मजकूर प्रसारित करण्यात आल्याचा आरोप एफआयआरमध्ये नमूद करण्यात आला आहे.
दरम्यान, या प्रकरणी महाराष्ट्र सायबरने प्रणित मोरे, हिमांशू जांग्रा आणि डॉ. सेजल पवार यांना चौकशीसाठी हजर राहण्याचे समन्स बजावले असून पुढील तपास सुरू आहे. या कारवाईमुळे सोशल मीडियावरील कंटेंट निर्मिती, अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि सार्वजनिक जबाबदारी याबाबत नव्याने चर्चा सुरू झाली आहे.