Mumbai Sion Hospital Attack: मुंबईमधील सायन हॉस्पिटल परिसरात घडलेली एक धक्कादायक घटना सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे. एका व्यक्तीच्या डोक्यात कोयता अडकलेल्या अवस्थेत तो स्वतःच रुग्णालयात चालत येताना दिसत असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, या व्यक्तीवर अज्ञात व्यक्तीने कोयत्याने हल्ला केला होता. गंभीर जखमी असूनही तो शुद्धीत राहून स्वतःच सायन रुग्णालयात पोहोचला. व्हिडिओमध्ये तो रुग्णालयाच्या परिसरात शांतपणे फिरताना, अगदी मोबाईल फोन पाहताना दिसत आहे, जे पाहून अनेकजण थक्क झाले आहेत.
या घटनेमागचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला असून, परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासून आरोपीचा शोध घेतला जात आहे.
हा व्हिडिओ समोर आल्यानंतर सोशल मीडियावर संताप आणि चिंता व्यक्त केली जात आहे. मुंबईसारख्या शहरात वाढत्या हिंसाचाराच्या घटनांबाबत पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. किरकोळ वादांमधूनही धारदार शस्त्रांचा वापर होण्याच्या घटना वाढत असल्याची चर्चा रंगली आहे.
दरम्यान, जखमी व्यक्तीवर रुग्णालयात उपचार सुरू असून त्याची प्रकृती कशी आहे याबाबत अधिकृत माहिती अद्याप समोर आलेली नाही. पोलिसांकडून लवकरच या प्रकरणाबाबत अधिक तपशील जाहीर केला जाण्याची शक्यता आहे.