Mumbai Sewage Tunnel Project Pudhari
मुंबई

Mumbai Sewage Tunnel Project: मलनिःसारण यंत्रणेला मिळणार मोठी क्षमता; पश्चिम उपनगरातील मलजल बोगदा टप्पा-१ यशस्वीरीत्या पूर्ण

बोरिवली ते मालाडदरम्यान भूमिगत मलजल बोगद्याचा अंतिम ब्रेक-थ्रू; चार उदंचन केंद्रांवरील अवलंबित्व कमी होण्याची अपेक्षा

पुढारी वृत्तसेवा

मुंबई: मुंबईतील जलप्रदूषणाला आळा घालण्यासाठी आणि पश्चिम उपनगरातील मलनिःसारण यंत्रणेवरील वाढता ताण कमी करण्यासाठी मुंबई महापालिकेने हाती घेतलेल्या प्राधान्य मलजल बोगदा टप्पा-१ प्रकल्पातील महत्त्वाचा टप्पा शुक्रवारी यशस्वीरीत्या पूर्ण झाला.

बोरिवलीतील डॉन बॉस्को स्कूल जंक्शन येथे ५.८ किलोमीटर लांबीच्या भूमिगत मलजल बोगद्याचा अंतिम ‘ब्रेक-थ्रू’ करण्यात आला. या प्रकल्पाचे आतापर्यंत ९० टक्के काम पूर्ण झाले आहे.

बोरिवलीतील डॉन बॉस्को स्कूल जंक्शन ते मालाडमधील मालवणी येथील नवीन उदंचन केंद्रादरम्यान हा बोगदा बांधण्यात येत आहे. ‘सेगमेंटल लायनिंग’ तंत्रज्ञानाचा वापर करून तयार करण्यात आलेल्या या बोगद्याचा अंतर्गत व्यास ३.२ मीटर असून, त्यातून प्रतिदिन १ हजार १८२ दशलक्ष लिटर मलजल वाहून नेण्याची क्षमता आहे.

पश्चिम उपनगरातील दहिसर, बोरिवली, गोराई, चारकोप, शिंपोली, मालाड आणि कांदिवली परिसरातील सध्याचे मलनिःसारण वाहिन्यांचे जाळे वाढत्या मलजलाच्या तुलनेत अपुरे पडत आहे. त्यामुळे अनेक वाहिन्यांवर अतिरिक्त ताण येत असल्याचे प्रशासनाचे म्हणणे आहे.

चार उदंचन केंद्रांची गरज संपणार

या प्रकल्पामुळे गोराई, शिंपोली, चारकोप आणि मालाड येथील चार उदंचन केंद्रांकडे सध्या वाहून नेण्यात येणाऱ्या मलजलाचे नियोजन नव्या बोगद्याच्या माध्यमातून करण्यात येणार आहे. त्यामुळे या केंद्रांची आवश्यकता कमी होऊन त्यांच्या देखभाल आणि दुरुस्तीवरील खर्चात बचत होण्याची अपेक्षा आहे.

मलजलावर योग्य प्रक्रिया करून त्याचा पर्यावरणपूरक निचरा करण्यास मदत होणार असल्याने समुद्र आणि नदीच्या पाण्यातील प्रदूषण कमी करण्याच्या दृष्टीनेही हा प्रकल्प महत्त्वपूर्ण ठरणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT