मुंबई: मुंबई शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या सातही तलावातील पाणी साठ्यामध्ये मोठी घट झाली असून या तलावामध्ये ७७ टक्के पाणीसाठा शिल्लक राहिला आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत पाणीसाठा १७ टक्क्यांनी म्हणजे १ लाख ९० हजार दशलक्ष लिटरने कमी आहे. त्यामुळे मुंबईकरांना उन्हाळ्यामध्ये पाणी टंचाईच्या भीषण संकटाचा सामना करावा लागणार आहे.
शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावाच्या पाणलोट क्षेत्रात यंदा कमी पाऊस झाल्यामुळे तलावातील पाणीसाठ्यामध्ये मोठी घट झाल्याचे दिसून येत आहे. शहराला दररोज सर्वाधिक २ हजार दशलक्ष लिटर पाणीपुरवठा करणाऱ्या राज्य सरकारच्या भातसा तलावातील पाणी साठ्यातही गेल्या वर्षीच्या तुलनेत मोठी घट झाली आहे. या तलावात गेल्या वर्षी ९० टक्के पाणीसाठा होता. यावेळी तो ८१ टक्केवर आला आहे. म्हणजे जवळपास ७० हजार दशलक्ष लिटर पाणीसाठा कमी आहे.
या तलावातून मुंबईसह भिवंडी ठाणे जिल्ह्यातील काही भागाला पाणीपुरवठा होतो. त्याशिवाय बाष्पीभवन यामुळे दररोज सरासरी ५ हजार दशलक्ष लिटर पाण्याचा उपसा होतो. त्यामुळे सरासरी महिन्याला दिड लाख दशलक्ष लिटर पाणी तलावातून उपसले जाते. त्यामुळे तलावमध्ये सध्याचा पाणीसाठा सात महिने पुरेल इतका आहे.
म्हणजेच जूनच्या पहिल्या पंधराव्यापर्यंत पुढील इतका आहे. त्यामुळे महापालिकेला सध्याच्या १० टक्के पाणी कपातीमध्ये अजून १० टक्के वाढ करावी लागणार आहे. त्यामुळे दररोज ८०० दशलक्ष लिटर पाण्याची बचत होऊ शकते, असे पालिकेच्या जल अभियंता विभागाकडून सांगण्यात आले.
पुढील पावसाळ्यापर्यंत मुंबईकरांना कमीत कमी पाणीटंचाई भासावी यासाठी पाणी बचतीचे काही निर्बंध अमलात आणण्यात येणार आहेत. यात जलतरण तलाव व इमारतीच्या बांधकामाच्या ठिकाणी देण्यात येणारी नळ जोडणी पूर्णपणे बंद करण्याचा विचार आहे.
त्याशिवाय शहरात असलेल्या मिनिरल कंपन्यांसह कोल्ड्रिंक व पाण्याचा वापर करणाऱ्या अन्य कंपन्यांचा पाणीपुरवठाही बंद करण्यात येणार आहे.
याबाबतचा निर्णय डिसेंबरनंतर करण्यासंदर्भात महापालिका विचार करत असल्याचे पालिकेच्या जल अभियंता विभागातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. त्यामुळे दररोज वीस ते पंचवीस दशलक्ष लिटर पाण्याची बचत होणार असल्याचेही सांगितले.
पनवेलमध्ये एक दिवस पाणीबंदी
अल निनोच्या प्रभावामुळे पावसाचे प्रमाण सरासरीपेक्षा कमी झाल्याने धरणातील उपलब्ध पाण्याचे नियोजन करण्यासाठी पनवेल महापालिकेने शहरात आठवड्यातून एक दिवस पाणीपुरवठा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. २३ नोव्हेंबरपासून या निर्णयाची अंमलबजावणी करण्यात येणार आहे.
सन २०२६-२७ या आर्थिक वर्षात अल निनोच्या प्रभावामुळे पावसाचे प्रमाण सरासरीपेक्षा कमी झाले आहे. धरणातील उपलब्ध पाणी ३१ ऑगस्ट २०२७ पर्यंत पुरविण्याचे निर्देश शासनाने ५ ऑक्टोबर २०२६ रोजीच्या निर्णयाद्वारे दिले आहेत.
या पार्श्वभूमीवर पनवेल महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने पाणी वितरणाचे नियोजन केले आहे. त्यानुसार सोमवार ते शनिवार शहरातील वेगवेगळ्या जलकुंभांशी संबंधित भागांचा पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे.