Crime News pudhari photo
मुंबई

Mumbai Crime : सुनावणीदरम्यान आरोपीचे पलायन; सत्र न्यायालयातील सुरक्षेवर प्रश्नचिन्ह

सत्र न्यायालयातून पोलिसांच्या हातावर तुरी देत गोळीबाराचा आरोपी पळाल्याने पोलीस दलात एकच खळबळ

पुढारी वृत्तसेवा

मुंबई : सुनावणीसाठी आणलेल्या एका 42 वर्षांच्या आरोपीने बेडीसह पलायन केल्याची घटना सत्र न्यायालयात घडली. हरिसन ॲन्थोनी जोसेफ असे या आरोपीचे नाव असून त्याच्याविरुद्ध कुलाबा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. त्याच्या अटकेसाठी स्थानिक पोलिसांसह गुन्हे शाखेने शोधमोहीम सुरु केली आहे.

मूळचा केरळचा रहिवाशी असलेला हरिसन हा क्रॉफर्डमार्केट परिसरात राहत होता. दोन वर्षांपूर्वी मार्च महिन्यांत त्याने पिशवी विक्रेता राजू शेख याच्यावर एअरगनने गोळीबार केला होता. त्याच्याविरुद्ध पोलिसांनी हत्येच्या प्रयत्नासह अन्य कलमांतर्गत गुन्हा दाखल केला असून, याच गुन्ह्यांत फरार असलेल्या हरिसनला नऊ महिन्यानंतर जानेवारी 2025 रोजी पोलिसांनी अटक केली होती. त्याच्यावर मोक्काही लावण्यात आल्यानंतर तो आर्थर रोड कारागृहात होता. मंगळवारी त्याला पुढील सुनावणीसाठी विशेष सत्र न्यायालयात हजर करण्यात आलेे.

सुनावणी पूर्ण होताच त्याला लॉकअपमध्ये नेण्यात येत असताना त्याच्यासोबत पोलीस शिपाई प्रशांत कांबळे हे होते. तिसऱ्या मजल्यावरुन दुसऱ्या मजल्यावर येताच त्याने प्रशांत कांबळे यांच्या हातावर फटका मारुन बेडीसह पलायन केले. पोलिसांनी सर्वत्र शोध घेऊनही तो कुठेच सापडला नाही.

रेल्वे स्थानकांवर शोध

तो केरळ येथील गावी पळून जाण्याची शक्यता असल्याने त्याच्या अटकेसाठी पोलिसांची पथके वेगवेगळ्या रेल्वे स्थानकात पाठविण्यात आली आहेत. त्याला लवकरच अटक केली जाईल असे पोलिसांकडून सांगण्यात आले.

  • सत्र न्यायालयातून पोलिसांच्या हातावर तुरी देत गोळीबाराचा आरोपी पळाल्याने पोलीस दलात एकच खळबळ उडाली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT