ठळक मुद्दे
मुंबईत शरद पवारांचे तीन नगरसेवक सोडून गेले
ठाकरेंकडून निष्ठावंत, अन् तरुणांना संधी
ठाकरेंच्या बालेकिल्ल्यात काँग्रेसचे उमेदवार अवघे २/३
मुंबई : उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत मंगळवारी संपत असतानाच एक दिवस आधी भाजप-शिवसेना शिंदे गटाच्या जागावाटपाचा फॉर्म्युला अखेर अंतिम झाला. मुंबई महानगरपालिकेच्या एकूण १३७ जागा भाजप लढविणार असून शिवसेनेच्या शिंदे गटाच्या वाट्याला ९० जागा गेल्या आहेत. तर, आरपीआयसह अन्य घटकपक्षांना जागा देण्याची जबाबदारी संबंधित मित्रपक्षावर असेल.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत झालेल्या बैठकीनंतर मुंबई भाजपाध्यक्ष अमीत साटम यांनी महायुतीचा फॉर्म्युला ठरल्याचे माध्यमांना सांगितले. मात्र, महायुतीतील अन्य छोट्या घटकपक्षांना सामावून घेण्याची जबाबदारी संबंधित मित्रपक्षाची असेल असे शिंदे गटाचे नेते राहुल शेवाळे यांनी सांगितले. याचा अर्थ आता रामदास आठवले यांच्या रिपाइंला जागा सोडण्याची जवाबदारी भाजपवर तर, आनंदराज आंबेडकर यांच्या रिपब्लिकन सेनेला सामावून घेण्याची जबाबदारी शिंदे गटावर असेल.
मुंबईतील २२७ जागांपैकी २०७जागांबाबत भाजप, शिंदे गटाची सहमती झाली होती. यापैकी १२८ जागा भाजपकडे तर ७९ जागा शिंदे गटाच्या वाट्याला गेल्या होत्या. मात्र, उर्वरित २० जागांचा तिढा सुटत नव्हता. शिंदे गटाने एकूण ९० जागांचा आग्रह कायम ठेवल्याने सोमवार रात्रीपर्यंत चर्चा आणि बैठकांचे सत्र सुरूच राहिले.
सोमवार (दि.29) रोजी दिवसभर मंत्री आशिष शेलार यांच्या बंगल्यावर दोन्ही पक्षांच्या नेत्यांच्या बैठका सुरू होत्या. अखेर रात्री दोन्ही पक्षांचे नेते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नंदनवन निवासस्थानी दाखल झाले. शिंदे यांच्या उपस्थितीत झालेल्या वाटाघाटीनंतर उर्वरित वीस जागांचा तिढा सुटला. या वीसपैकी ११ जागा शिंदे गटाला सोडण्यात आल्या. तर, भाजपने माघार घेत ९ जागा मान्य केल्या. आता मुंबईत भाजप १३७जागांवर तर शिवसेना शिंदे गट ९० जागांवर आपले उमेदवार उभे करणार आहे.