Mumbai Sea Link Overspeeding: मुंबईतील बांद्रा-वरळी सी-लिंकवर वेगाने कार चालवण्याचा धक्कादायक प्रकार पुन्हा एकदा समोर आला आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका व्हिडिओमध्ये कार तब्बल 200 किमी वेगाने सी-लिंकवर धावताना दिसत आहे.
या व्हिडिओमुळे सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू झाली असून, मुंबई पोलिसांनी याची गंभीर दखल घेतली आहे. सी-लिंकवर वेगमर्यादा फक्त 80 किमी प्रतितास आहे. अशा परिस्थितीत 200 किमीने कार चालवण्याचा हा प्रकार गुन्हा तर आहेच, पण इतर वाहनचालकांचा जीव धोक्यात घालणारा आहे.
मुंबई ट्रॅफिक पोलिसांनी व्हिडिओ पाहून चौकशी सुरू केली आहे. कारची नंबर प्लेट ओळखण्याचा प्रयत्न सुरू असून, संबंधित चालक कोण आहे आणि हा व्हिडिओ नेमका कधी शूट झाला, याबाबतही चौकशी केली जात आहे.
गेल्या काही महिन्यांत सी-लिंकवर अतिवेग, रेसिंग आणि स्टंट्सचे प्रकार वाढताना दिसत आहेत. अनेक वेळा पोलिसांनी दंडात्मक कारवाईही केली, तरीही काही वाहनचालक नियमांकडे दुर्लक्ष करून जीवघेणे स्टंट करत आहेत. या परिसरात सीसीटीव्ही असूनही काही चालक नियम मोडत आहेत, असे पोलिसांचे निरीक्षण आहे.
व्हायरल व्हिडिओवर नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे. “हवं तर स्वतःचा जीव धोक्यात घाल, पण इतरांचा जीव का धोक्यात घालतोस?” अशा प्रतिक्रिया सोशल मीडियावर दिसत आहेत.
नागरिकांनी पोलिसांकडे सी-लिंकवर अशा प्रकारचे स्टंट करणाऱ्यांना कडक शिक्षा मिळायला हवी, अशी मागणी केली आहे.