Mumbai Sea Level Rise Pudhari
मुंबई

Mumbai Sea Level Rise: समुद्राच्या वाढत्या पातळीमुळे मुंबई, कोलकात्याला जलसमाधीचा धोका; कोट्यवधी लोकांचे अस्तित्व संकटात

जागतिक तापमानवाढीमुळे समुद्रपातळी वेगाने वाढत असून मुंबई, कोलकाता आणि ढाक्यातील १ कोटी ४० लाखांहून अधिक नागरिकांना जलमग्नता व विस्थापनाचा धोका असल्याचा संयुक्त राष्ट्रांच्या अहवालात इशारा देण्यात आला आहे.

पुढारी वृत्तसेवा

मुंबई: जागतिक तापमानवाढ आणि वेगाने वाढणाऱ्या समुद्रपातळीमुळे मुंबई आणि कोलकाता यांसारख्या किनारपट्टीच्या शहरांमधील कोट्यवधी नागरिक बेघर होण्याच्या उंबरठ्यावर आहेत.

संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांनी प्रसिद्ध केलेल्या ‘समुद्रपातळीतील आव्हाने आणि उपाय’ या अहवालानुसार, ही वाढ आता केवळ भविष्यातील धोका राहिलेली नसून वर्तमानात वेगाने घडणारी आपत्ती ठरली आहे.

दक्षिण आशियातील मुंबई, कोलकाता आणि ढाका या शहरांमधील १ कोटी ४० लाखांहून अधिक लोकांना कायमस्वरूपी जलमग्नतेचा आणि मोठ्या विस्थापनाचा धोका निर्माण झाला आहे.

पायाभूत सुविधा व आरोग्यावर गंभीर परिणाम

अहवालानुसार, वाढती समुद्रपातळी शहरी पायाभूत सुविधा, ऊर्जा ग्रीड, वाहतूक यंत्रणा आणि पिण्याच्या पाण्याच्या स्रोतांचे प्रचंड नुकसान करत आहे. गोड्या पाण्याच्या विहिरींमध्ये समुद्राचे खारे पाणी मिसळल्याने शेती आणि आरोग्याचा प्रश्न गंभीर बनला आहे.

जलजन्य आजारांचा प्रादुर्भाव, मानसिक ताण आणि किनारपट्टीवरील पूरस्थितीमुळे स्थानिक मच्छीमार व पर्यटन व्यवसायावर मोठा परिणाम होत आहे. अमेरिकेतील न्यूयॉर्क, मियामी या शहरांमध्ये कोट्यवधी डॉलर्सच्या आर्थिक मालमत्तेचा धोका आहे, तर भारतासारख्या विकसनशील देशांत मानवी जीवनाचे अतोनात नुकसान होण्याची भीती आहे.

हिमालयातील हिमनद्या वितळल्याने पुराचा धोका

केवळ किनारपट्टीच नव्हे, तर हिमालयाच्या पर्वतरांगांमध्येही हिमनद्या वेगाने वितळत असल्याने विध्वंसक महापुराचा धोका वाढला आहे. नेपाळ, भारत आणि चीनमधील अनेक धोकादायक हिम-सरोवरांचे नैसर्गिक बांध फुटल्यास नद्यांच्या खोऱ्यात महाप्रलय येऊ शकतो. संयुक्त राष्ट्रांच्या अंदाजानुसार, तंत्रज्ञानाच्या साहाय्यानेही या विशाल नद्यांचा पूर रोखणे कठीण आहे. जलविद्युत प्रकल्प नष्ट होण्यासोबतच नदीकाठच्या लाखो लोकांना स्थलांतर करावे लागणार आहे.

दीर्घकालीन उपाययोजनांची गरज

२०१२ ते २०२५ या काळात जागतिक समुद्रपातळी दरवर्षी सरासरी ४.७५ मिमीने वाढली असून, समुद्राच्या वाढत्या तापमानामुळे ही गती तीव्र झाली आहे. किनारपट्टीचे संरक्षण करण्यासाठी नद्या, भूजल आणि समुद्राच्या एकात्मिक नियोजनाची, आपत्कालीन निधीची आणि कडक धोरणांची अंमलबजावणी करणे आवश्यक असल्याचे संयुक्त राष्ट्रांनी स्पष्ट केले आहे.

मुंबई आणि कोलकात्यातील कोट्यवधी लोकांच्या घरांवर कायमस्वरूपी पाण्याखाली जाण्याची आणि विस्थापनाची थेट टांगती तलवार आहे.

ग्लोबल वॉर्मिंगमुळे समुद्राच्या पाण्याच्या पातळीत विक्रमी वेगाने वाढ होत असून पायाभूत सुविधा आणि पिण्याच्या पाण्याचे मोठे नुकसान होत आहे.

मियामी आणि न्यूयॉर्कसारख्या शहरांना प्रचंड आर्थिक फटका, तर दक्षिण आशियातील किनारपट्टीच्या शहरांना मानवी विस्थापनाचा गंभीर धोका निर्माण झाला आहे.

हिमालयातील हिमनद्या वितळल्याने भविष्यात भीषण महापूर येण्याची शक्यता असून नदीकाठची शहरे मानवी वस्तीसाठी अयोग्य ठरू शकतात.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT