मुंबई ः मुंबईतील समुद्रात बॉम्बस्फोटाची धमकी देणारा कॉल नवी मुंबईतील कंट्रोल रुमला प्राप्त झाल्याने किनारपट्टीवर पोलीस बंदोबस्तात वाढ करण्यात आली आहे. अज्ञात व्यक्तीने केलेल्या या कॉलनंतर नवी मुंबई पोलिसांकडून मुंबई पोलिसांना तशा सूचना देण्यात आल्या.
या कॉलनंतर दक्षिण मुंबईतील बंदोबस्तात प्रचंड वाढ करण्यात आली आहे. समुद्रातील गस्त वाढविण्यासह संशयित व्यक्ती किंवा बोटीची कसून तपासणी करा असा आदेश वरिष्ठांकडून देण्यात आला आहे.
नवी मुंबईतील महापे कंट्रोल रुमला एका अज्ञात व्यक्तीने कॉल करुन समुद्रकिनार्यावर बॉम्बस्फोट होणार असल्याचे सांगून कॉल कट केला होता. 26/11 च्या वेळेस अतिरेकी समुद्रमार्गे मुंबईत आले होते. या पार्श्वभूमीवर या धमकीची पोलिसांकडून गंभीर दखल घेण्यात आली आहे. त्यामुळे सर्व यंत्रणांना सतर्क राहून बंदोबस्त वाढविण्याचे आदेश देण्यात आले आहेत. समुद्रकिनार्यावरील बंदोबस्त वाढविण्यात आला असून सागरी पोलिसांना समुद्रात जास्तीत जास्त गस्त घालण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
प्राथमिक तपासात हा बोगस कॉल असल्याचे उघडकीस आले आहे. कोणीतरी खोडसाळपणा म्हणून हा कॉल केल्याचे बोलले जाते. तरीही या धमकीकडे दुर्लक्ष करुन चालणार नाही, असे वरिष्ठ पोलीस अधिकार्यांकडून सांगण्यात आले. हा कॉल कोणी आणि कोठून आला याचा आता पोलिसांकडून तपास सुरू आहे.
या धमकीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. गुप्तचर विभागासह एटीएस आणि नौदलाला ही माहिती देण्यात आल्याचे सांगण्यात आले. यापूर्वी मुंबई शहरात शासकीय-निमशासकीय कार्यालय, धार्मिक स्थळे, रेल्वे स्थानक, सिनेमागृह, शाळा, कॉलेजमध्ये बॉम्बस्फोट होणार असल्याचे कॉल आले होते, आता समुद्रात बॉम्बस्फोट होणार असल्याच्या धमकीने संपूर्ण यंत्रणा सतर्क झाली आहे.