मुंबई: शाळा सुरू होऊन एक महिन्यापेक्षा जास्त कालावधी लोटल्यानंतर मुंबई महानगरपालिकेला विद्यार्थ्यांना वर्कबुक व व्यक्तींची पुस्तके देण्याचा साक्षात्कार झाला आहे. या खरेदीसाठी निविदा प्रक्रिया राबवण्यात आली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या हातात वर्कबुक व व्याकरणाची पुस्तके पडायला सप्टेंबर उजाडणार आहे.
वर्कबुक म्हणजे कार्यपुस्तिका किंवा अभ्यास पुस्तिका असे म्हटले जाते. हे विद्यार्थ्यांचे ज्ञान वाढवण्यासाठी खूप उपयोगाचे असते. ज्यामध्ये विविध प्रश्न, उदाहरणे आणि ते सोडवण्यासाठी रिकाम्या जागा दिलेल्या असतात. विद्यार्थी उत्तरे थेट याच पुस्तकात लिहितात.
महानगरपालिकेच्या शाळांमध्ये मुंबईतील सर्वसामान्य व गरीब कुटुंबातील मुले शिक्षण घेतात. या मुलांसाठी शालेय वस्तू खरेदी करणे पालकांना आर्थिकदृष्ट्या परवडणारे नसल्यामुळे मुंबई महापालिका दरवर्षी २७ शालेय वस्तूंचे मोफत वाटप करते.
यामध्ये शालेय पुस्तकांसह दप्तर, छत्र्या, शूज, रेनकोट, पाण्याची बाटली, पेन्सिल, वह्या, गणवेश व अन्य साहित्याचा समावेश आहे. पण या वस्तू विद्यार्थ्यांना कधी वेळेत मिळाल्याच नाहीत. यंदाही शालेय वस्तू खरेदीला विलंब झाला असून अनेक वस्तू अद्यापपर्यंत मिळालेल्या नाहीत. वर्कबुक व व्याकरण पुस्तकांची खरेदी करण्यासाठी आता निविदा प्रक्रिया राबवण्यात आली आहे.
वर्कबुक व व्याकरण पुस्तक खरेदीसाठी राबवण्यात असलेल्या निविदा प्रक्रियेला किमान १५ दिवसांपेक्षा जास्त कालावधी लागणार आहे. त्यानंतर पुरवठादाराची नियुक्ती व स्थायी समितीमध्ये प्रस्ताव सादर करण्यास १५ दिवसांचा कालावधी अपेक्षित आहे. स्थायी समितीच्या मंजुरीनंतर पुरवठादाराला कार्यादेश देण्यात येणार आहे.
त्यामुळे ऑक्टोबर महिन्यात वर्कबुक व व्याकरणाची पुस्तके मिळतील असे सांगण्यात येत आहे. या पुस्तकांचे पालिकेच्या मराठी, हिंदी, इंग्रजी, गुजराती, तमिळ, तेलगू, कन्नड आणि उर्दू या ८ माध्यमांच्या शाळांमध्ये तीन लाखांपेक्षा अधिक विद्यार्थ्यांना वाटप करण्यात येणार आहे.