उरण, पुढारी वृत्तसेवा : युनेस्कोने जागतिक वारसा स्थळ म्हणून १९८७ साली घोषीत केलेल्या जागतिक किर्तीच्या रायगड जिल्ह्यातील उरण तालुक्यांतील एलिफंटा अर्थात घारापुरी लेण्यांना १२ सदस्यांच्या रशियन शिष्टमंडळाने शनिवारी भेट दिली. काळ्या पाषाणात कोरलेल्या जागतिक कीर्तीच्या एलिफंटा लेण्यांची पहाणी करताना रशियन शिष्टमंडऴातील सर्व सदस्य हरखून गेले होते. यावेळी घारापुरी ग्रामपंचायतीच्या वतीने उपसरपंच बळीराम ठाकूर यांनी शिष्टमंडळातील सर्व सदस्यांचे स्वागत केले. एलिफंटा बेटावर असलेल्या लेण्यांमधील शिवाच्या अनेक कलाकृती विविध रुपात पाषाणात कोरण्यात आली आहेत. या कलाकृती, लेण्यांची आणि बेटावरील विकासाची माहिती उपसरपंच बळीराम ठाकूर शिष्टमंडळाला दिली.यावेळी ग्रामपंचायत सरपंच, सदस्य उपस्थित होते. (Elephanta Caves)
अवघ्या विश्वात एकमेव असलेल्या एलिफंटा लेणी मुंबई पासून अवघ्या काही अंतरावर रायगड जिल्ह्यातील उरण तालुक्यांत घारपुरी बेटावर आहेत. भगवान शंकराला समर्पित असलेल्या या लेण्यांमध्ये शिवाच्या तीन भव्य मूर्ती पहायला मिळतात.भारतातील प्रमुख ऐतिहासिक आणि महत्वांच्या पर्यटन स्थळांपैकी एक असलेल्या या भव्य लेण्या 2 वेगवेगळ्या धर्मांमध्ये विभागल्या गेल्या आहेत. या गुफांच्या एका भागात हिंदू धर्माशी जोडल्या गेलेल्या गुफा असून अन्य भागात बौद्ध धर्माशी संबंधित लेण्या आढळतात. (Elephanta Caves)
घारापुरीची किंवा एलिफंटा लेणी ही भव्य आकाराच्या शिल्पासाठी प्रसिद्ध आहेत. पाषाणात खोदलेली ही लेणी इ.स.९ ते १३ या शतकाच निर्माण करण्यात आल्या आहेत. १९८७ साली या लेण्यांना युनेस्कोने जागतिक वारसा स्थळाचा दर्जा दिला. घारापूरी लेण्यांच्या प्रवेशद्वाराजवळ हत्तीचे प्रचंड आकाराचे एक शिल्प होते, त्यावरूनच या लेण्यांना एलिफंटा लेणी असे नाव पडले. हे शिल्प सध्या मुंबईच्या राणीच्या बागेत आहे. (Elephanta Caves)
एलिफंटा लेण्यां एका अखंड पाषाणात कोरण्यात आल्या आहेत. ज्या काळी पाश्चात्त्य देशांमध्ये मानवी वसाहतीचा मागमूससुद्धा नव्हता त्याकाळी भारतीयांनी इतक्या दुर्गम भागात ही अफाट कलाकृती निर्माण केली. या गावाचे प्राचीन नाव श्रीपुरी असे होते.कोकणातल्या मौर्य वंशाची घारापुरी ही राजधानी असावी. त्यानंतर चालुक्य, राष्ट्रकूट , यादवनी मोगल यांनी तिथे क्रमाक्रमाने आपली सत्ता प्रस्थापित केली.सोळाव्या शतकाच्या पूर्वार्धात हे बेट पोर्तुगीजांच्या ताब्यात गेले.शिवाजी महाराजांच्या काळात ते मराठ्यांनी ताब्यात घेतले होते तर सन १७७४ मध्ये त्यावर इंग्रजांनी आपले वर्चस्व प्रस्थापीत केले होते.असा सारा इतिहास या शिष्टमंडळाने यावेळी जाणून घेतला. (Elephanta Caves)