मुंबई : रस्ते खोदकामावरील बंदी 1 ऑक्टोबरपासून उठवण्यात येणार असून पावसाळ्यात बंद असलेली काँक्रिटच्या रस्त्यांची कामे आता पुन्हा सुरू होणार आहेत. परिणामी, शहर व उपनगरांतील अनेक रस्ते वाहतूक कोंडीत सापडणार आहेत. याचा त्रास करोडो मुंबईकरांना सहन करावा लागणार आहे.
मुंबई शहर व उपनगरात 395 किमीच्या रस्त्यांची कामे सुरू आहेत. यात पश्चिम उपनगरात 253 पूर्व उपनगरात 70 तर शहरात 72 किमी कामांचा समावेश आहे. मे महिन्याते पाऊस सुरू झाल्यामुळे या रस्त्यांची कामे अर्धवट राहिली.1 जून ते 30 सप्टेंबरपर्यंत रस्ते खोदण्यास पूर्णपणे बंदी आहे. खोदलेले रस्ते पूर्ववत करून वाहनांसाठी मोकळे करून देण्यात आले. परंतु आता पाऊस थांबल्याने ही कामे सुरू होणार आहेत.
रस्त्यांचे काम सुरू असताना एकेरी वाहतूक सुरू असते तर काही ठिकाणी पर्यायी मार्गाने वाहतूक वळवण्यात येते. त्यामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होते. अनेक ठिकाणी रस्त्याखालून पर्जन्य जलवाहिन्या, जलवाहिन्या व अन्य युटीलिटी टाकण्यासाठी पदपथही खोदले जातात. त्यामुळे नागरिकांना भररस्त्यातून चालावे लागते. पावसाळ्यात रस्त्यांची कामे बंद असल्याने नागरिकांचा प्रवास सुखकर झाला होता. मात्र आता पुन्हा या कामांमुळे त्यांना त्रास सहन करावा लागणार आहे.
नागरिकांची सुरक्षा बंधनकारक
रस्त्यांची कामे सुरू असताना कंत्राटदाराने नागरिकांच्या सुरक्षेला प्राधान्य दिले पाहिजे. तशा अटी व शर्ती निविदांत आहेत. यात काम सुरू असलेल्या ठिकाणी बॅरिकेट्स लावणे, नागरिकांना चालण्यासाठी रस्ता ठेवणे, दिशादर्शक लावणे, आजूबाजूचा परिसर स्वच्छ ठेवणे आदी जबाबदारी पार पाडणे आवश्यक असल्याचे मुंबई महानगरपालिकेकडून सांगण्यात आले आहे.
रस्ते काँक्रिटीकरणाची प्रगती पहा घरबसल्या
रस्ते काँक्रिटीकरणामुळे मेटाकुटीस आलेल्या मुंबईकरांना आता आपल्या दळणवळणाचा रस्ता कधी पूर्ण होणार याची इत्यंभूत माहिती ऑनलाईन मिळणार आहे. हीींिीं://ीेरवी.ालसा.र्सेीं.ळपर्/िीलश्रळलवरीहलेरीव/ या डॅशबोर्डवर परिमंडळनिहाय व विभागनिहाय रस्ते काँक्रिटीकरणाची प्रगती पाहता येणार आहे.
पावसाळ्यापूर्वी पूर्ण झालेली, सुरू असलेली तसेच कामे सुरू न झालेल्या रस्त्यांची माहिती येथे अपडेट केली जाणार आहे. कोणत्या रस्त्यांची कामे हाती हाती घेतली जाणार आहेत, त्यांची कामे पूर्ण होण्यासाठी किती कालावधी लागेल असे सर्व अंदाजित वेळापत्रक येथे पाहता येणार आहे. यामुळे मुंबईकरांना रस्त्यांच्या काँक्रिटीकरणाची पारदर्शक माहिती घरबसल्या मिळणार असून, ‘खड्डेमुक्त मुंबई’चा आराखडा अधिक ठळकपणे नागरिकांसमोर येणार आहे.
या रस्त्यांची कामे सुरू
शहर - लेडी लक्ष्मीबाई जगमोहन मार्ग, नारायण दाभोळकर मार्ग, वीर नरिमन रोड, कुपरेज रोड.
पश्चिम उपनगर - भास्कर भोपी मार्ग, लिंक रोड, जयराज नगर रोड, दयालदास रोड, लिंक रोड, गोरेगाव मुलुंड लिंक रोड गोरेगावकडे जाणारा रस्ता.
पूर्व उपनगर - एम. एन. रोड, डीपी रोड नंबर 9, बी. आर. रोड एन. बी. पाटील मार्ग, बाजीप्रभू देशपांडे मार्ग, छेडा नगर रोड क्र. 1, पी. सोमाणी मार्ग, रहेजा विहार रोड.