Mumbai Road Cleaning Pudhari
मुंबई

Mumbai Road Cleaning: मुंबईतील रस्ते धुण्यासाठी प्रक्रिया केलेल्या पाण्याचा पालिकेला आधार

पिण्याच्या पाण्याचा वापर करण्याचा प्रस्ताव फेटाळला; कुलाब्यातील प्रक्रिया केंद्रातून मिळणारे पाणी पुरणार का?

पुढारी वृत्तसेवा

मुंबई: मुंबईतील रस्ते धुण्यासाठी पिण्याच्या पाण्याचा वापर करण्याचा प्रस्ताव स्थायी समितीच्या बैठकीत फेटाळल्यानंतर आता मुंबई महापालिका प्रशासनाने प्रक्रिया केलेले पाणी वापरण्याच्या पर्यायाची चाचपणी सुरू केली आहे.

मात्र, मुंबईत केवळ कुलाबा येथे पाण्यावर प्रक्रिया करण्याचे केंद्र असल्याने तेथून उपलब्ध होणारे पाणी संपूर्ण मुंबईतील रस्ते धुण्यासाठी पुरणार का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

दरम्यान, प्रदूषण नियंत्रणासाठी इलेक्ट्रिक बेकऱ्या आणि विद्युत दाहिन्यांच्या वापराला प्रोत्साहन देण्यावरही महापालिकेने भर दिला आहे.

वायुप्रदूषण कमी करण्यासाठी पालिका करत असलेल्या उपाययोजनांची माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत अतिरिक्त आयुक्त डॉ. अविनाश ढाकणे यांनी प्रक्रिया केलेले पाणी रस्ते धुण्यासाठी वापरण्याचे संकेत दिले.

मुंबईच्या विविध भागांत पालिका तसेच खासगी मालकीच्या विहिरी आहेत. या विहिरी अधिग्रहित करून त्यातील पाणी पिण्याव्यतिरिक्त अन्य कामांसाठी वापरण्याचे महापालिकेचे नियोजन आहे. रस्ते धुण्यासाठी या विहिरींचे पाणी वापरण्याची शक्यता कमी असल्याचे दिसून येत आहे.

हवेच्या गुणवत्तेत सुधारणा झाल्याचा पालिकेचा दावा

मुंबईतील हवेच्या गुणवत्तेत सुधारणा होत असल्याचा दावा महापालिकेने केला आहे. हवा गुणवत्ता निर्देशांकानुसार, 'चांगल्या' व 'समाधानकारक' श्रेणीतील दिवसांची संख्या २०२३ मध्ये १८५ होती. २०२४ मध्ये ती २१६, तर २०२५ मध्ये २१८ दिवसांवर पोहोचली.

म्हणजेच २०२३ च्या तुलनेत २०२५ मध्ये अशा दिवसांमध्ये ३३ दिवसांची वाढ झाली. २०२६ मध्ये २२ ऑक्टोबरपर्यंत ही संख्या २३१ दिवसांवर पोहोचल्याचे महापालिकेने म्हटले आहे.

लाकडांचा वापर कमी करून प्रदूषण नियंत्रणात आणण्यासाठी विविध भागांतील स्मशानभूमी विद्युत दाहिनीच्या पर्यायाकडे वळवण्याचे महापालिकेचे प्रयत्न सुरू आहेत.

बेकऱ्यांचे ‘इलेक्ट्रिक’ रूपांतर न करणाऱ्यांवर कारवाई

वायुप्रदूषणाला आळा घालण्यासाठी बेकऱ्यांनी पारंपरिक इंधनाऐवजी इलेक्ट्रिक उपकरणांचा वापर करावा, असे निर्देश पालिकेने मागील वर्षी दिले होते. आतापर्यंत सुमारे ७८ टक्के बेकऱ्यांनी इलेक्ट्रिकचा वापर सुरू केल्याची माहिती ढाकणे यांनी दिली. अद्याप इलेक्ट्रिकमध्ये रूपांतर न केलेल्या बेकऱ्यांवर कारवाई केली जाणार असल्याचा इशारा त्यांनी दिला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT