घाटकोपर: घाटकोपर अंधेरी लिंक रस्त्यावर जागृती नगर मेट्रो स्थानकाखाली एका भरधाव वेगाने आलेल्या कंटेनरने रविवार दि. ३० रोजी पहाटे पाच वाजताच्या दरम्यान दुचाकीला धडक दिली. यात दुचाकीवरील अल्पवयीन चालक गणेश सुनील महामुनी (१४) आणि मागे बसलेला आर्यन आलोकनाथ पासवान (१५) राहणार सिद्धार्थ नगर, घाटकोपर या दोन मुलांचा मृत्यू झाला आहे.
घाटकोपरच्या भटवाडी सिद्धार्थ नगर परिसरात ही दोन्ही मुले कुटुंबासह राहतात. गणेशने रविवारी पहाटे घरातून वडिलांची स्कूटी घेतली आणि आर्यनला मागे बसवून घेऊन निघाला. स्कूटी चालवत हे दोघेही घाटकोपर- अंधेरी लिंक रोडवर आले.
दुचाकी जागृती नगर मेट्रो स्थानकाच्या खाली आली असता मागून भरधाव वेगाने प्रकाश बलदेवराम चहर (३४) हा चालक कंटेनर घेऊन आला आणि त्याने स्कूटीला धडक दिली. दोघेही मुले या कंटेनरच्या मागच्या चाकाखाली चिरडली गेली.
पोलिसांनी या दोन्ही जखमी मुलांना राजावाडी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. या प्रकरणी पोलिसांनी कंटेनरचालक प्रकाश चहरवर गुन्हा दाखल करत अटक केली आहे. या दुर्घटनेमुळे सिद्धार्थ नगर परिसरावर शोककळा पसरली आहे.
गतिरोधक हटविल्याने अपघातांना निमंत्रण
अपघात झाला, ते ठिकाण रहदारीचे आहे. तिथे जागृतीनगर रेल्वे स्टेशन, सरस्वती विद्या मंदिर शाळा, जवळच मार्केटही आहे. त्यामुळे या ठिकाणी वाहनांची व पादचाऱ्यांनी मोठी वर्दळ असते.
प्रशासनाने अग्निशमनची वाहने व रुग्णवाहिकांना ये-जा करण्यास विलंब होत असल्याचे सांगत तेथील दोन गतिरोधक हटविले आहे. रहिवाशांनी गतिरोधकासाठी प्रशासनाकडे मागणीही केली होती. गतिरोधक असते तर कदाचित हा अपघात झाला नसता, अशी प्रतिक्रिया स्थानिक रहिवाशांकडून व्यक्त केली जात आहे.