मुंबई : मुंबईसारख्या आंतरराष्ट्रीय शहरातही महापालिका गावपण जपणार आहे. गावी गेल्यावर आपण नदीच्या पाण्यात जाऊन जशी डुक्की मारतो, तशीच डुबकी मुंबईतील नद्यांमध्येही मारता येणार आहे. यासाठी मुंबईतील मिठी नदीसह दहिसर, ओशिवरा, पोईसर नद्यांना पूर्वीचे वैभव प्राप्त करून दिले जाणार आहे. नद्यांमध्ये वाहणारे पाणी शुद्ध कसे राहील, याची विशेष खबरदारी घेण्यात येणार आहे.
मुंबई उपनगरात पूर्वी गावच्या नदीप्रमाणे मिठीसह दहिसर, ओशिवरा, पोईसर या नद्यांमधील पाणी स्वच्छ होते. नॅशनल पार्कमधून उगम पावणाऱ्या या नद्यांच्या पाण्याचा वापर शेतीसह अन्य कारणासाठी केला जात होता.
पूर्वी या नद्यांमध्ये आजूबाजूच्या भागातील नागरिक कपडे धुण्यासह लहान मुले पाण्यात मनसोक्त डुबकी मारत होते. मात्र आता मुंबईत नदी असल्याचे सांगूनही कुणाला खरे वाटणार नाही. परंतु या नद्यांना आता पूर्वीचे वैभव प्राप्त करून देण्यासाठी मुंबई महानगरपालिकेने पावले उचलली आहेत.
नाल्यामध्ये रूपांतर झालेल्या या नद्यांचे रुंदीकरण, खोलीकरण करण्यासह नद्यांमधील पाणी शुद्ध कसे राहील, यासाठी विशेष प्रकल्प हाती घेण्यात येणार आहे. अलीकडेच पालिकेच्या पर्जन्य जलवाहीनी विभागांमार्फत नद्यांच्या रुंदीकरण व नदी किनाऱ्यालगत संरक्षण भिंतींचे बांधकाम हाती घेतले आहे.
नदीच्या दोन्ही बाजुस सेवारस्ता बांधून आजूबाजूच्या वसाहतीतून येणारे सांडपाणी मलजलवाहीनी टाकून उदंचन केंद्रापर्यंत वाहून नेणे व पुढे समुद्रात सोडण्याचा प्रकल्प तयार करण्यात आला आहे.
यासह झोपडपट्ट्यांतून नदीत येणाऱ्या सांडपाण्याला अटकाव घालून तेथे मलःजलप्रक्रिया केंद्र बांधून प्रक्रीया केलेले पाणी नदीमध्ये सोडण्यात येणार आहे. त्यामुळे नदीमध्ये पावसाळ्याव्यतिरिक्त स्वच्छ पाण्याचा प्रवाह राहील, असा विश्वास पर्जन्य जलवाहिनी विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी व्यक्त केला.
ओशिवरा नदीचा उगम गोरेगाव, आरे कॉलनीमध्ये होतो. सुमारेस 7 किमी लांबीची ही नदी नॅशनल पार्कमधून पुढे गोरेगावच्या टेकड्यांमधून वाहते. त्यानंतर ती ओशिवरा औद्योगिक वस्तीतून जाते आणि मालाडजवळच्या खाडीमार्गे अरबी समुद्राला मिळते.
दहिसर नदी पश्चिम उपनगरातील बोरीवली नॅशनल पार्कमधील तुळशी तलावातून उगम पावते. 8 किमी लांबीची ही नदी पुढे बोरिवली भागातून वाहत जात, गोराई-मनोरी खाडीला मिळते.
पोईसर नदीचा उगम बोरीवली नॅशनल पार्क येथून होतो. सुमारे 9 किलोमीटर लांबीची ही नदी कांदिवली भागातून वाहत वाहत वहात वर्सोवा खाडीला मिळते.
डीपीआर अंतिम टप्प्यात
नॅशनल रिव्हर ऑथोरिटी ऑफ इंडिया आणि केंद्रीय जलसंधारण व नदी विकासक मंत्रालय, हे नद्यांच्या संवर्धनासाठी मोठ्या प्रमाणात अनुदान देतात. या अनुदानासाठी पालिकेने सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर) तयार करण्याचे काम हाती घेतले असून हे अंतिम टप्प्यात आहे. त्यामुळे मुंबईतील नद्यांचा विकास करण्यासाठी पालिकेला मोठी आर्थिक मदत मिळणार आहे.