मुंबई / नाशिक : मंत्र - तंत्र, अघोरी पूजा आणि नारळातून स्फोट घडवून १५ कोटी रुपयांचा पैशाचा पाऊस पाडतो, अशी थाप मारून मुंबईतील सेवानिवृत्त नागरिकास लाखोंचा गंडा घालणाऱ्या भोंदूबाबाच्या टोळीचा बुरखा अभोणा पोलिसांनी फाडला आहे. या प्रकरणातील मुख्य साथीदार विशाल पवार यास पोलिसांनी कळवण तालुक्यातील वडाळे गावातून अटक केली. इतरांचा शोध सुरु आहे.
पिंपळे खुर्द येथील भोंदूबाबा हिराचंद शिवाजी बर्डे उर्फ राजूबाबा, मुख्य साथीदार विशाल पवार आणि त्यांच्या सहा साथीदारांनी मुंबईतील बोरिवली येथील राजाराम शेलार यांना जाळ्यात ओढले होते. सुरुवातीला छोटी रक्कम मोठी करून दाखवत विश्वास मिळवला. त्यानंतर ११ लाख द्या, १५ कोटींचा पाऊस पाडून देतो, असे आमिष दाखवत रोख आणि ऑनलाइन माध्यमातून १० लाख ९५ हजार रुपये लाटले.
पूजेच्या नावाखाली नारळाचा स्फोट घडवून चमत्काराचा बनाव केला. ३ कोटी रुपयांचा पाऊस पडला आहे, असे सांगत नोटांनी भरलेली गोणी त्यांच्या ताब्यात दिली. सात दिवस गोणी उघडली, तर कोप होऊन अनिष्ट होईल, अशी अघोरी भीती घातली. पीडितांना संशय आल्यामुळे गोणी उघडली असता, धक्काच बसला. वरच्या बाजूला एक खरी ५०० रुपयांची नोट आणि आतमध्ये लहान मुलांच्या खेळण्यातील बनावट नोटांचे बंडल आढळले.
फसवणूक झालेली लक्षात येताच, पीडितांनी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या मदतीने अभोणा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. याप्रकरणी जादूटोणाविरोधी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपासादरम्यान पोलिसांनी भोंदूबाबा हिराचंद बर्डेच्या घरावर छापा टाकून ७ लाख २० हजार रुपये रोख, चार दुचाकी, तीन ट्रॅक्टर, महिंद्रा कार आणि प्रवासी वाहतुकीचे वाहन असा ५२ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
गुन्हा दाखल होताच आरोपी विशाल पवार हा पळून गेला होता. पोलिसांच्या पथकाने तांत्रिक तपासाच्या आधारे त्याचा माग काढत त्याला वडाळे गावातून ताब्यात घेतले. पवार याच्या इतर साथीदारांचा शाेध सुरु आहे.