मुंबई : जुलै ते सप्टेंबर या गेल्या तीन महिन्यांच्या कालावधीत देशातल्या प्रमुख 8 शहरांमध्ये 87 हजार 603 घरांची विक्री झाली. यात मुंबईतील 24 हजार 706 घरांचा समावेश आहे. मुंबईत घरांची सर्वाधिक विक्री झाली आहे. यात वार्षिक 2 टक्क्यांची वाढ दिसून आली.
यावर्षी जानेवारी ते सप्टेंबर या कालावधीत मुंबईत 71 हजार 741 घरांची विक्री झाली. यातील 24 हजार 706 घरे जुलै ते सप्टेंबर या कालावधीतील आहेत. या कालावधीत देशभरात 88 हजार 655 नवी घरे विक्रीसाठी उपलब्ध झाली. यातील सर्वाधिक 19 हजार 145 घरे मुंबईतील आहेत. 15 हजार 234 घरे पुण्यातील आहेत. मुंबईच्या नव्या घरांमध्ये 19 टक्क्यांनी घट झाली आहे, तर पुण्यात 1 टक्क्याने वाढ झाली आहे. नाइट फ्रँक इंडियाच्या अहवालातून ही माहिती समोर आली आहे.
देशभरात विक्री झालेल्या 87 हजार 603 घरांमध्ये 1 ते 2 कोटी किमतीच्या घरांची संख्या 24 हजार 944 आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यात 17 टक्के वाढ झाली आहे. 5 ते 10 कोटींच्या घरांची संख्या 4 हजार 539 आहे. यात गेल्या वर्षीच्या तुलनेत 33 टक्के वाढ झाली आहे. 50 लाखांपेक्षा कमी किमतीच्या घरांची संख्या 17 हजार 463 आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यात 16 टक्के घट झाली आहे.