मुंबई: मुंबईकर २०१४ पासून म्हणजेच तब्बल १२ वर्षांपासून जंगलच्या राजाची म्हणजेच सिंहाची प्रतीक्षा करीत आहे. पण ही प्रतीक्षा अद्याप तरी कायमच आहे. महापौरांनी थेट गुजरातच्या मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रानंतरही गुजरात सक्करबाग प्राणीसंग्रहालयाकडून फारसा प्रतिसाद मिळालेला नाही.
भायखळा येथील वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान व प्राणी संग्रहालय (राणीबाग) येथील जिमी सिंहीणीचा २०१४ मध्ये मृत्यू झाल्यानंतर राणीबागेत येणाऱ्या पर्यटकांना सिंहाचे दर्शन झालेले नाही. राणीबागेत सिंह आणण्यासाठी महापालिका प्रशासनाने अनेक प्रयत्न केले.
परंतु १२ वर्षांनंतरही सिंह आणता आला नाही. मुंबईकरांना जंगलाच्या राजाचे दर्शन व्हावे यासाठी स्वतः महापौर रितू तावडे यांनी पुढाकार घेतला होता. २६ मार्चला गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र सिंह यांना पत्र लिहून सिंहाची मागणी केली होती. पण मुख्यमंत्र्यांनीही याची दखल घेतलेली नाही.
इस्रायल येथून आणण्यात येणाऱ्या झेब्रा सकरबाग प्राणीसंग्रहालयाला दिल्यानंतर त्या बदल्यात सिंह राणीबागेसाठी देण्यात येणार आहे. मात्र राणीबाग प्रशासनाने झेब्राऐवजी अन्य पशुपक्षी देण्यास तयारी दर्शवली आहे. परंतु सक्करबाग प्राणी संग्रहालयाला ते मान्य नाही. या वादात सिंहाचे आगमन लांबणीवर पडले आहे.
महापौरांनी गुजरातच्या मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवून सात महिने लोटले आहेत. त्यानंतर राणीबाग प्रशासनाकडून अनेकदा पत्रव्यवहार करण्यात आला. मात्र गुजरात प्राणी संग्रहालयाकडून प्रतिसादच मिळत नाही. त्यामुळे मुंबईकरांसह राणीबागेला भेट देणाऱ्या देशी-विदेशी पर्यटकांची सिंह दर्शनाची प्रतीक्षा कायम आहे.
मेंटेनन्सचा खर्च वाढतोय
गुजरात येथून आणण्यात येणारा सिंह घनदाट जंगलात वावरतो, तसे त्याला राणीबागेत वावरता येणार आहे. राणीबागेत तसा पिंजराही बनवण्यात आला आहे. हा पिंजरा गुजरातमधील गीर अभयारण्य पट्टयात राहणाऱ्या नागरिकांच्या मलदाई झोपडीच्या प्रतिकृतीसारखा आहे.
सिंहाला आराम करण्यासाठी जंगलाचा भास निर्माण करणारी मोकळी जागा, गुहा व बसण्यासाठी मचान तयार करण्यात आले आहे. सध्या या पिंजऱ्याच्या मेंटेनन्सचा खर्च वाढत आहे.