मुंबई : राणीच्या बागेतील प्राणी व पक्षांसाठी पिजर्यांंची संख्या वाढविण्यात येणार असून सुसर व मगर प्रजातींच्या प्राण्यांसाठी स्वच्छ हवा मिळावा यासाठी त्यांच्या पिंजर्यामध्ये अत्याधुनिक जीवरक्षक प्रणाली बसवण्यात येणार आहेत. यावर 13 लाख 37 हजारांचा खर्च महापालिका करणार आहे.
राणीबागेच्या विस्तारासह अन्य नुतनीकरणाची कामे अंतिम टप्प्यात आहेत. अनेक प्रजातीच्या पक्षांसह प्राण्यांचे पिंजरे तयार करण्यात आले आहेत. मगर व सुसर या प्राण्यांसाठी अत्याधुनिक काचेचा पिंजरे बनवण्यात आले आहेत. या पिंजर्यातील वातावरण अधिक नैसर्गिक राहावे व जीवन रक्षक प्रणालीचा अभाव भासू नये, यासाठी जीवरक्षक प्रणालीमध्ये मोठ्या प्रमाणात सुधारणा करण्यात येणार आहे. त्यामुळे मगर व सुसरसाठी येथील वातावरण प्रदूषण मुक्त होणार आहे. या कामासाठी लवकरच निविदा प्रक्रिया राबवण्यात येणार असून ही प्रक्रिया महिन्याभरात पूर्ण करून प्रत्यक्षात जीव रक्षक प्रणालीमध्ये सुधारणा करण्याचे काम हाती घेतले जाणार असल्याचे पालिकेकडून सांगण्यात आले.
10 एकर जागेत पिंजरे उभारणार
राणीबागेच्या विस्तारीकरणाच्या कामामध्ये 10 एकर भूखंडावर विविध सुविधांसह देशी विदेशी प्रजातींच्या प्राण्यांचे पिंजरे उभारण्यात येणार आहेत. या कामाचा आराखडा तयार करण्याचे काम अंतिम टप्प्यात असून लवकरच निविदा प्रक्रिया राबवून विस्तारीकरणाच्या कामाला सुरुवात करण्यात येणार असल्याचे एका वरिष्ठ अधिकार्याने सांगितले. या कामामुळे राणीबागेत जिराफ, झेब्रा यांच्यासह पांढरा सिंह, चित्ता, काळा जग्वार, रिंगटेल लेमर, वॉलाबी, चिंपांझी, मँड्रिल माकड लेसर फ्लेमिंगो असे अनेक देशी-विदेशी प्राण्यांचे पर्यटकांना दर्शन घडणार आहे.