मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राज्यातील पावसाच्या स्थितीचा सातत्याने आढावा घेत आहेत.  (Pudhari Photo)
मुंबई

Mumbai Rain Alert | मुंबईत पुढील २४ तासांत वादळी वार्‍यासह पावसाचा अंदाज : मुख्यमंत्री फडणवीसांचा प्रशासनाला सतर्कतेचा इशारा

Devendra Fadnavis | नुकसानग्रस्त भागाचे तत्काळ पंचनामे करण्याचे आदेश

पुढारी वृत्तसेवा

Heavy Rain Forecast Mumbai CM Fadnavis Weather Update

मुंबई : मुंबईत पुढील २४ तासांसाठी पावसाचा रेड अलर्ट देण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राज्यातील पावसाच्या स्थितीचा सातत्याने आढावा घेत आहेत. संपूर्ण प्रशासनाला अलर्ट मोडवर राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. ज्या ठिकाणी नुकसान झाले तेथे तत्काळ पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत. राज्याच्या मुख्य सचिव आणि राज्याच्या आपत्ती निवारण कक्षाशी ते सातत्याने संपर्कात आहेत.

मुंबई आणि एमएमआर या भागात अतिवृष्टी

राज्यात पुणे, सातारा, सोलापूर, रायगड, मुंबई आणि एमएमआर या भागात अतिवृष्टी झालेली आहे. दौंडमध्ये 117 मि.मी., बारामतीत 104.75 मि.मी., इंदापुरात 63.25 मि.मी. इतका पाऊस झाला.

बारामतीत पुरात अडकलेल्या 7 जणांना वाचविण्यात यश

- बारामतीत 25 घरांशी अंशत: पडझड झाली असून, पुरात अडकलेल्या 7 जणांना वाचविण्यात आले आहे. 70 ते 80 कुटुंबांना सुरक्षितस्थळी स्थलांतरित करण्यात आले आहे. मोबाईल सेवा काल विस्कळित झाल्या होत्या. त्या आता पूर्ववत होत आहेत.

- इंदापूर येथे 2 जणांना पूरस्थितीतून बाहेर काढण्यात आले आहे.

- फलटणमध्ये 163.5 मि.मी. इतका पाऊस झाला. एनडीआरएफची एक चमू फलटणमध्ये आहे. 30 नागरिक दुधेबावी गावाशेजारी अडकले होते. त्यांना निवास आणि भोजनाची सुविधा पुरविण्यात आली आहे.

पंढरपूर येथे भीमा नदी पात्रात 3 जण अडकले

सोलापूरमध्ये 67.75 मि.मी. पाऊस झाला. माळशिरस तालुक्यात 6 नागरिक पुरात अडकले होते, त्यांना सुरक्षितस्थळी हलविण्यात आले आहे. पंढरपूर येथे भीमा नदी पात्रात 3 जण अडकले, त्यांचे बचावकार्य सुरु आहे.

रायगडमध्ये एकाचा वीज पडून मृत्यू झाला, तर महाड ते रायगड किल्ला रस्ता अतिवृष्टीमुळे बंद करण्यात आला आहे.

मुंबईत 5 ठिकाणी एनडीआरएफची टीम सज्ज 

मुंबईत 24 तासात 135.4 मि.मी. इतक्या पावसाची नोंद झाली आहे. मुंबईत एकूण 6 ठिकाणी पाणी साचण्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या. एकूण 18 ठिकाणी शॉर्टसर्किटच्या घटना घडल्याच्या तर 5 ठिकाणी इमारतीच्या भिंती पडण्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. मुंबई महापालिका, अग्निशमन दल, मुंबई पोलिस आणि इतरही सर्व यंत्रणा सज्ज आहेत. कुठेही जीवितहानी झालेली नाही. मुंबईत 5 ठिकाणी एनडीआरएफ टीम कुठल्याही प्रकारच्या मदतीसाठी सज्ज आहेत.

मुंबईत पुढील 24 तास विजांचा गडगडाट आणि वादळी वार्‍यासह पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT