Mumbai Rains
मुंबई : मुसळधार पावसामुळे मुंबईतील सर्व शासकीय आणि खासगी कार्यालये, आस्थापने यांना मंगळवारी (दि. १९ ऑगस्ट) सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. भारतीय हवामान खात्याने बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रात (मुंबई शहर आणि उपनगरे) अतिमुसळधार पावसाचा रेड अलर्ट दिल्यामुळे ही सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.
बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील आपत्कालीन कार्यालयाची सेवा सोडून सर्व खासगी कार्यालये आणि आस्थापना यांना जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण या नात्याने महानगरपालिकेकडून आज सुट्टी जाहीर करण्यात येत आहे. संबंधित कार्यालये, आस्थापना यांनी कामकाजाच्या स्वरूपानुसार, कर्मचाऱ्यांना घरी राहून कामकाज (वर्क फ्रॉम होम) करण्याच्या सूचना तातडीने द्याव्यात, असे आवाहन पालिकेने केले आहे.
अरबी समुद्राला मंगळवारी सकाळी मोठी भरती येणार असून ३.७५ मीटरपेक्षा जास्त उंचीच्या लाटा उसळतील. त्यामुळे मुंबईत तुंबणाऱ्या पाण्याचा निचरा होण्यास उशीर लागण्याची शक्यता आहे. मुंबईत पावसाचा जोर कायम राहणार असल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे.
सोमवारी सकाळी ८ ते मंगळवारी सकाळी ८ वाजेपर्यंत मालाड येथे सर्वाधिक ३६१ मिमी विक्रमी पावसाची नोंद झाली. तर त्या खालोखाल कांदिवली येथे ३३७ मिमी, मागाठाणे ३०४ मिमी आणि दादर येथे ३०० मिमी पाऊस झाला आहे.
२४ तासांतील पाऊस
दादर - ३०० मिमी
चेंबूर - २९७ मिमी
चिंचोली, मालाड- ३६१ मिमी
वडाळा - २८२ मिमी
विक्रोळी पश्चिम - २९३ मिमी
वर्सोवा - २४० मिमी
पवई - २९० मिमी
कांदिवली - ३३७ मिमी
सायन - २५२ मिमी
मुलूंड - २८८ मिमी
दिंडोशी - ३०५ मिमी
वरळीनाका - २५० मिमी
टागोर नगर, विक्रोळी - २८७ मिमी
मागाठाणे - ३०४ मिमी