Mumbai Rainfall 2026 Pudhari
मुंबई

Mumbai Rainfall 2026: मुंबईत आतापर्यंत बरसला ७५ टक्के पाऊस

आतापर्यंत वार्षिक सरासरी पावसाच्या ७५ टक्के पाऊस झाला आहे.

पुढारी वृत्तसेवा

मुंबई: मुंबई शहर व उपनगरात पावसाची रिमझिम सुरूच असून आतापर्यंत वार्षिक सरासरी पावसाच्या तुलनेत ७५ टक्के पाऊस पडला आहे. यात सर्वाधिक पावसाची नोंद उपनगरात झाली आहे. २०२५ मध्ये ही टक्केवारी ५० ते ५२ टक्के इतकीच होती.

मुंबई शहरात जून अखेरीस पावसाने दमदार हजेरी लावली. त्यानंतर मुंबईत समाधानकारक पाऊस पडला. त्यामुळे आतापर्यंत वार्षिक सरासरी पावसाच्या ७५ टक्के पाऊस झाला आहे.

पावसाचे अजून दोन महिने शिल्लक असल्यामुळे यावेळी वार्षिक सरासरी पावसापेक्षा जास्त पाऊस होईल, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. शहर विभागात वार्षिक सरासरी २०९५ मिमी पाऊस होतो. तर उपनगरामध्ये सरासरी २,३१९ मिमी पाऊस होतो.

२०२५ च्या तुलनेत आतापर्यंत जास्त पाऊस झाला आहे. कुलाबा वेधशाळेने शहरात ७६ टक्के म्हणजे १५९९ मिमी तर सांताक्रुझ वेधशाळेने उपनगरात ८१ टक्के म्हणजे १८९५ मिमी पावसाची नोंद केली आहे. २०२५ मध्ये शहरात ४५ टक्के म्हणजे ९५० मिमी व उपनगरात ५५ टक्के म्हणजे १२९१ मिमी पाऊस झाला होता.

मुंबई महानगरपालिकेने शहर, पश्चिम उपनगर व पूर्व उपनगर अशी पावसाची नोंद केली आहे. यात शहरांमध्ये १,४७६ मिमी, पूर्व उपनगर १,७८९ मिमी व पश्चिम उपनगरात १,७३० मिमी पाऊस झाला.

गेल्यावर्षीच्या तुलनेत हा पाऊस २०० ते २५० मिमीपेक्षा जास्त असल्याचे पालिकेकडून सांगण्यात आले. पावसाळ्याचे अजून दोन महिने शिल्लक असल्यामुळे यंदा १२० टक्केपेक्षा जास्त पाऊस होईल, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

पावसाची रिमझिम

रविवारप्रमाणे सोमवारीही शहर व उपनगरात पावसाची रिमझिम सुरू होती. बांद्रा, खार, अंधेरी, भांडुप, दादर आदी भागात पावसाच्या मध्यम व जोरदार सरी पडल्या. रस्त्यावरील वाहतूक मात्र सुरळीत सुरू होती.

पश्चिम द्रुतगती महामार्ग बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स व काही रस्त्यांवरील वाहतूक कोंडीचे अपवाद वगळता कुठेही वाहतूक कोंडी झाली नाही. दरम्यान दिवसभरात शहरात १५ मिमी पश्चिम उपनगरात २० मिमी तर पूर्व उपनगरात १८ मीमी पाऊस झाला. तर १४ ठिकाणी झाडे व झाडाच्या फांद्या पडल्या. तर दोन ठिकाणी शॉर्टसर्किटच्या किरकोळ घटना घडल्या.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT