Mumbai Rain Updates: मान्सूनने मुंबईत पुन्हा एकदा जोरदार हजेरी लावली आहे. सलग तिसऱ्या दिवशी सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे शहरातील जनजीवन विस्कळीत होण्यास सुरुवात झाली आहे. पहाटेपासून मुंबई, पूर्व आणि पश्चिम उपनगरांसह अनेक भागांमध्ये जोरदार सरी कोसळत असून, सखल भागांत पाणी साचल्याने नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे.
हवामान विभागाने दिलेला मुसळधार पावसाचा अंदाज खरा ठरत असून, पुढील काही तासांतही काही भागांत अतिवृष्टी होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. त्यामुळे नागरिकांनी गरज असेल तेव्हाच घराबाहेर पडावे, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.
मध्यरात्रीपासूनच अंधेरी, जोगेश्वरी, गोरेगाव, मालाड, कांदिवली, बोरिवली, दहिसर, विलेपार्ले, सांताक्रूझ आणि वांद्रे परिसरात जोरदार पाऊस सुरू आहे. सततच्या पावसामुळे अनेक सखल भागांत पाणी साचू लागले आहे. सकाळच्या गर्दीच्या वेळी कामासाठी बाहेर पडणाऱ्या मुंबईकरांना याचा मोठा फटका बसण्याची शक्यता आहे.
पावसाचा परिणाम मुंबईच्या जीवनवाहिनीवरही झाला आहे. मध्य आणि हार्बर मार्गावरील लोकल गाड्या १० ते १५ मिनिटे, तर पश्चिम रेल्वेवरील लोकल १५ ते २० मिनिटे उशिराने धावत आहेत. त्यामुळे सकाळच्या गर्दीच्या वेळी अनेक प्रवाशांची तारांबळ उडाली.
मुसळधार पावसामुळे अंधेरी सबवेमध्ये सुमारे दोन फूट पाणी साचले होते. सुरक्षेच्या दृष्टीने काही काळ वाहतूक बंद ठेवण्यात आली होती. मात्र पाणी उपसण्याचे काम पूर्ण झाल्यानंतर सबवे पुन्हा वाहनांसाठी खुला करण्यात आला असून वाहतूक पूर्ववत सुरू झाली आहे.
पावसाचा जोर अद्याप कायम असल्याने सखल भागात राहणाऱ्या नागरिकांनी सतर्क राहावे, अनावश्यक प्रवास टाळावा आणि हवामान विभाग तसेच स्थानिक प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे. पुढील काही तास मुंबईसाठी महत्त्वाचे ठरणार असून पावसाचा जोर वाढण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.