मुंबई : मान्सूनने मंगळवारी मुंबईत दाखल होत रात्रभर जोरदार हजेरी लावत सुमारे २०० ते ३०० मिमी इतका बरसला आणि विश्रांती घेतली आहे. गुरुवारी दिवसभरात जेमतेम १५ ते २० मिमी पावसाची नोंद झाली आहे. सकाळपासूनच संपूर्ण शहरात ऊन पडले होते. त्यामुळे पुन्हा उकाडा वाढला आहे.
मुसळधार झालेल्या वसामुळे संपूर्ण मुंबई शहरात निर्माण झालेला गारवा औटघटकीचा ठरला आहे. बुधवारी सकाळपासूनच पावसाचा जोर पूर्णपणे ओसरला आहे. गुरुवारी दिवसभरात पावसाच्या काही तुरळक सरी वगळता कडक ऊन पडले होते. दरम्यान येणाऱ्या २४ तासात मुंबईत अंशतः ढगाळ वातावरण राहणार असून विजांच्या कडकडाटासह मध्यम व हलका पाऊस पडण्याची शक्यता वेधशाळेने वर्तवली आहे.
नवी मुंबईत ५.८२ मिमी
नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रात मागील २४ तासांत हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची नोंद झाली असून विविध विभागांमध्ये एकूण सरासरी ५.८२ मिमी पाऊस पडला आहे.
३.५८ मीटर उंचीच्या लाटा
गुरुवारी सकाळी साडेनऊच्या सुमारास अरबी समुद्राला मोठी भरती असल्यामुळे सुमारे ३.५८ मीटर उंचीच्या लाटा उसळल्या होत्या. त्यामुळे समुद्रकिनारी फेरफटका मारणाऱ्यांना सतर्कतेचे इशारा देण्यात आला होता. शुक्रवारी सकाळी १०.१२ वाजता अरबी समुद्रामध्ये भरती असून यावेळी ३.७६ मीटर उंचीच्या लाटा उसळणार आहेत. त्यामुळे समुद्रकिनारी फेरफटका मारणाऱ्यांना सावधगिरीचा इशारा देण्यात आला आहे. दरम्यान समुद्राला भरती असताना जीवरक्षकांनीही सतर्क राहण्याच्या सूचना महापालिका प्रशासनाकडून देण्यात आल्या आहेत.
दिवसभरात कुठे किती पाऊस?
शहर - ८ मिमी
पश्चिम उपनगर - ९ मिमी
पूर्व उपनगर - ७ मिमी