Pune Rainfall : पुणेकरांची घालमेल संपली, तब्बल १५ दिवसांनी मान्सूनपूर्व पावसाची दमदार हजेरी; NDA भागात अतिवृष्टीची नोंद

तासाभरात ७८.५ मि.मी., मनसोक्त भिजण्याचा आनंद लुटला
Pune Rainfall : पुणेकरांची घालमेल संपली, तब्बल १५ दिवसांनी मान्सूनपूर्व पावसाची दमदार हजेरी; NDA भागात अतिवृष्टीची नोंद
Published on
Updated on

पुणे : घन..घन..माला नभी दाटल्या.. कोसळती धारा...या गाण्यातील ओळींचा प्रत्यय घेण्यासाठी पुणेकर आतूर झाले होते. अखेर तो दिवस रविवारी (दि. २१) उगवला अन्‌ शहरात तब्बल १५ दिवसांच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर २० जून रोजी यंदाच्या हंगामातील पहिल्या मान्सूनपूर्व सरी बरसल्या. एनडीए भागात तासाभरात ७८.५ मि.मी पावसाची नोंद झाली. त्या पाठोपाठ खडकवासला ६०, तर शिवाजीनगर भागात १८ मि.मी. पावसाची नोंद झाली. पुणेकरांनी या आनंद लहरींचे स्वागत केले. प्रत्येकाने घराच्या छतावर जात त्या अंगावर घेत आनंद लुटला. यात बच्चे कंपनी रस्त्यांवर नाचत होती.

पंधरा दिवसांच्या प्रतीक्षेनंतर अखेर पुण्यात मान्सूनपूर्व पावसाने हजेरी लावली. त्यामुळे पुणेकरांची भयंकर उकाड्यातून सुटका झाली. पावसाची चातकाप्रमाणे वाट पाहणाऱ्या पुणेकरांच्या आनंदाला पारावार उरला नाही. गेले दोन दिवस शहरावर दाट ढगांची चादर होती, मात्र पाऊस पडत नव्हता.अखेर रविवारचा दिवस उजाडला तो काळ्याभोर ढगांनी. दुपारी १ वाजता अचानक टपोरे थेंब पडले अन्‌ यंदाच्या हंगामातील पहिला मृदगंध दरवळला. विजांचा कडकटाट अन‌् सोसाट्याच्या वाऱ्यासह जोरदार पावसाला सुरुवात झाली.

रविवार अन् भिजण्याचा आनंद

पाऊस कधी येईल? या चिंतेने यंदा पुणेकर हैराण होते. तोच रविवारी सुट्टीच्या दिवशी दुपारी १ च्या सुमारास पावसाला सुरुवात होताच लहान मुले रस्त्यांवर पाळत सुटली... तर, मोठ्यां‌नी घराच्या छतावर जात आनंद लहरींचे स्वागत केले. यंदाचा पहिला पाऊस अंगावर घेत असह्य झालेला उकाडा कमी केला. शहरातील काही भागांत मात्र पावसाचा थेंबही नव्हता. त्यामुळे नागरिकांनी एकमेकांना फोन करून तुमच्या भागात पाऊस आला का, अशी चौकशी करताना दिसले.

एनडीए भागात अतिवृष्टी...

शहरातील एनडीए भागात पावसाचा जोर सर्वाधिक होता. त्या ठिकाणी तासाभरांत ७८.५ मि.मी नोंद झाल्याने तो अतिवृष्टीत गणला गेला. तसेच खडकवासला, शिवाजीनगर, कर्वेनगर, महापालिका परिसर, कात्रज, पर्वती भागात पावसाचा जोर होता.शहरातील मुंढवा,मगरपट्टा,नगर रस्ता या भागात पाऊस पडला नाही. लोहगाव, पाषाण, लवळे भागात अत्यंत कमी पावसाची नोंद झाली.

रविवारी झालेला पाऊस (वेळ : दुपारी १ ते सायं. ५)

  • एनडीए ७८.५

  • खडकवासला : ६०

  • मनपा परिसर : २०

  • शिवाजीनगर : १८.३

  • कात्रज : १८

  • पर्वतीः २०

  • हडपसरः ८.५

  • पाषाण : ४.५

  • लवळे १.५

यंदा आणि मागच्या वर्षीची स्थिती

मागच्या वर्षी पुणे शहरात १५ ते २४ मे दरम्यान मान्सूनपूर्व पाऊस बरसला होता. त्यानंतर २६ मे रोजी मान्सून शहरात दाखल झाला. त्यामुळे मेमध्ये तब्बल २८० मि. मी., तर पुढे जूनमध्ये २७० मि. मी. पावसाची नोंद झाली. मात्र, यंदा अल निनो सक्रिय झाल्याने २० जूनपर्यंत शहरात मान्सूनपूर्व पाऊस बरसलेला नव्हता. यंदा एप्रिलमध्ये शहरात मुसळधार पाऊस झाला. त्यानंतर तब्बल ५० दिवस पावसाचा थेंबही पडेला नव्हता.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news