Mumbai Rain Acharya Atre Metro Station Water Logging
नमिता धुरी, मुंबई
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते लोकार्पण झालेले भुयारी मेट्रो मार्गिकेवरील आचार्य अत्रे चौक स्थानक पहिल्याच पावसात बुडाले. सोमवारी या स्थानकात मोठ्या प्रमाणावर गळती सुरू होती. त्यामुळे सर्वत्र पाणी तर साचलेच पण स्लॅब कोसळून स्थानकाच्या बांधकामावर प्रश्नचिन्ह उभे राहिले.
दरवर्षी १० ते १५ जूनच्या दरम्यान मुंबईत आगमन करणार्या मोसमी पावसाने यावर्षी जून महिना सुरू होण्याच्या आधीच मुंबई गाठली. याबाबतचा इशारा हवामान विभागाने आधीच दिला होता; मात्र याकडे दुर्लक्ष करणे मेट्रो प्रशासनाला भोवले. बांधकाम सुरू असलेल्या प्रवेशद्वारातून सांडपाणी निःस्सारण पाणी आत शिरले. पाणी थांबवण्यासाठी बांधण्यात आलेली भिंत कोसळली, अशी माहिती एमएमआरसीएलने दिली आहे.; मात्र पावसाचा परिणाम एवढा मर्यादित नाही. मेट्रो ज्या ठिकाणी थांबते त्या ठिकाणी प्लॅटफॉर्मच्या छतामधून मोठ्या प्रमाणावर गळती लागली होती. त्यामुळे प्लॅटफॉर्मवर सर्वत्र पाणी साचले होते.
जेथे प्रवासी तिकीट स्कॅन करून आत प्रवेश करतात किंवा बाहेर जातात त्या ठिकाणीही छताचा काही भाग कोसळला. स्वच्छतागृहातील पाणी स्थानक परिसरात राहणार्या घरांमध्ये शिरल्याचे काही रहिवाशांनी सांगितले; मात्र या परिस्थितीवर मेट्रो प्रशासनाने अधिकृत भाष्य केलेले नाही. प्रवेशद्वाराचे कायमस्वरुपी काम पूर्ण होण्यास आणखी ३ महिने लागणार आहेत. पाणी थांबवण्यासाठी बांधण्यात येणार्या तात्पुरत्या भिंतीचे काम १० जूनपर्यंत पूर्ण करण्यात येणार होते; मात्र लवकर आलेल्या पावसाने मेट्रो प्रशासनाची तारांबळ उडवली.
गेल्या काही दिवसांपासून मुंबईत पावसाळी वातावरण आहे. दोनच दिवसांपूर्वी पाऊस केरळमध्ये दाखल झाला. या आठवड्याच्या सुरुवातीला तो मुंबईत दाखल होईल असा इशारा हवामान विभागाने दिला होता. या पार्श्वभूमीवर मेट्रो प्रशासनाने सावधगिरी बाळगणे अपेक्षित होते. तसे न झाल्याने मेट्रो स्थानकाचे प्रचंड नुकसान झाले. याबाबत कंत्राटदारावर काही कारवाई होणार का, याबाबत एमएमआरसीएलने काहीही माहिती दिली नाही.
मेट्रो 3 ने घटनेबाबत काय स्पष्टीकरण दिले?
मेट्रो 3 ने प्रसिद्धीपत्रकाद्वारे घटनेबाबत स्पष्टीकरण दिले आहे. आचार्य अत्रे स्थानकाचे अद्याप काम पूर्ण झालेले नाही. त्यामुळे जेथून हे पाणी शिरले तो मार्ग आगमन वा प्रस्थानासाठी वापरण्यात येत नव्हता. तेथे कायमस्वरुपी काम अद्याप पूर्ण झालेले नाही. (हे कायमस्वरुपी काम येत्या 3 महिन्यात होईल). मात्र तुर्तास तेथून पाणी येऊ नये म्हणून तात्पुरती संरक्षक भिंत उभारण्याचे काम सुरु होते. हे पूर्ण काम 10 जूनपर्यंत पूर्ण होईल, असा अंदाज होता. मात्र, पाऊस लवकर आला. लगतच्या भागातून पाण्याचा मारा आणि मुसळधार पावसाने यामुळे ती पडली, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.