मुंबई: दिल्लीतून मुंबईसह देशातील प्रमुख शहरांमध्ये कोकेनचा पुरवठा करणाऱ्या आंतरराष्ट्रीय अमली पदार्थ रॅकेटवर मोठी कारवाई करत दिल्ली पोलिसांनी दोन नायजेरियन महिलांना अटक केली आहे.
मुंबईच्या दिशेने प्रवास करणाऱ्या संशयिताकडून सुमारे २० कोटी किमतीचे कोकेन जप्त करण्यात आले असून या रॅकेटचे मुंबईशी असलेले संबंध तपासाच्या केंद्रस्थानी आले आहेत. मुंबईतील ग्राहक, पेडलर्स आणि आर्थिक व्यवहारांची चौकशी होणार आहे.
तपासात या महिला परदेशातून भारतात आणलेले कोकेन दिल्लीत साठवून तेथून मुंबईसह इतर महानगरांतील ग्राहक आणि पेडलर्सपर्यंत पोहोचवत असल्याची माहिती तपासात समोर आली आहे. या रॅकेटमध्ये आणखी काही विदेशी नागरिक आणि भारतीय साथीदारांचा सहभाग असल्याचा संशय आहे.
या महिलांकडून मुंबईतील उच्चभ्रू भाग, पार्टी सर्किट आणि ड्रग्ज पेडलर्सपर्यंत या नेटवर्कद्वारे कोकेनचा पुरवठा होत होता का, याचा तपास सुरू आहे. संशयितांचे मोबाईल फोन, आर्थिक व्यवहार, बँक खात्यांची माहिती आणि डिजिटल पुरावे तपासले जात आहेत.
मुंबई हे आंतरराष्ट्रीय अमली पदार्थ तस्करांचे प्रमुख लक्ष्य राहिले आहे. यापूर्वीही मुंबई विमानतळ, डीआरआय आणि एनसीबीने अनेक परदेशी नागरिकांना कोकेनसह अटक केली असून दिल्ली-मुंबई मार्गाचा वापर करून अमली पदार्थांची तस्करी होत असल्याची अनेक प्रकरणे समोर आली आहेत.