मुंबई: मुंबई-पुणे या मिसिंग लिंकवरून सुरुवातीला 6 महिने केवळ कार आणि बस या वाहनांनाच परवानगी देण्यात आली आहे. अवजड वाहने आणि धोकादायक मालाची वाहतूक करणाऱ्या वाहनांना जुन्या घाट मार्गचा वापर करावा लागेल. या एक्स्प्रेस वेवरील एकूण रहदारीपैकी सुमारे 70 टक्के हिस्सा हा कार आणि बसचाच असतो तर 30 टक्के अवजड वाहतूक या मार्गाने होते. मिसिंग लिंकमुळे वाहतुकीचा ताण कमी होणार असून ट्रॅफिक जामची समस्या सुटण्यास मदत होईल.
टोल फ्री मार्ग
या हायटेक मार्गावरून प्रवासासाठी कोणताही टोल भरावा लागणार नाही. मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर शनिवारी-रविवारी मोठी गर्दी असते. लोणावळा आणि खंडाळा घाटात त्यामुळे वाहतूक कोंडी होते. मिसिंग लिंकमुळे या वाहतूक कोंडीतून प्रवाशांची सुटका होणार असल्याची माहिती महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळचे जनसंपर्क अधिकारी तुषार अहिरे यांनी दिली.
आशियातील सर्वात लांब बोगदा
मिसिंग लिंक प्रकल्पामध्ये दोन मुख्य बोगद्यांचा समावेश आहे. त्याची लांबी 8.92 किलोमीटर आणि 1.9 किलोमीटर इतकी आहे. यातील 8.92 किलोमीटर लांबीचा आणि 23.5 मीटर रुंदीचा हा बोगदा आशियातील सर्वात लांब बोगद्यांपैकी एक आहे.
या विक्रमी रुंदीमुळे या प्रकल्पाची नोंद गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डस्मध्ये होण्याची शक्यता आहे. त्याबाबत आवश्यक निरीक्षणे देखील पूर्ण झाली आहेत; तर टायगर व्हॅलीमध्ये 180 मीटर पेक्षा अधिक उंचीवर 650 मीटर लांबीचा ‘केबल स्टेड’ पूल उभारण्यात आला आहे.