

मुंबई: विधान परिषदेच्या रिक्त होणाऱ्या 10 जागांसाठी 12 मे रोजी मतदान होणार आहे. या 10 पैकी एक जागा राष्ट्रवादी काँग्रेसला मिळणार असली तरी इच्छुकांची संख्या मोठी आहे. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यासमोर उमेदवार निवडीची कसोटी आहे.
अजित पवार यांची पक्षावर पकड होती. आता सुनेत्रा पवार, खासदार पार्थ पवार तसेच जय पवार यांच्यात जबाबदारीचे वाटप झाले आहे. त्यामुळे विधान परिषदेच्या निवडणुकीत कोणाला उमेदवारी द्यायची हे कोण निश्चित करणार, याकडे लक्ष लागले आहे.
या निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांकडून हालचाली सुरू आहेत. भाजपने 30 जणांच्या नावांची यादी केंद्रातील नेतृत्वाकडे पाठवली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून एका जागेसाठी कोणाला संधी द्यायची, यासाठी चर्चा सुरू आहेत.
या निवडणुकीतून पक्षातील निर्णय प्रक्रियेवर पवार कुटुंबाचे वर्चस्व असल्याचे दाखविण्याची पुन्हा एकदा संधी मिळणार आहे. राष्ट्रवादीच्या एका जागेसाठी सात नावांची चर्चा आहे. प्रफुल्ल पटेल यांचे निकटवर्तीय माजी आमदार राजेंद्र जैन, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांचे चिरंजीव अनिकेत तटकरे, बाबा सिद्दिकी यांचे पुत्र झिशान सिद्दिकी, राष्ट्रवादीचे प्रवक्ते आनंद परांजपे, सुनील टिंगरे, सिद्धार्थ कांबळे आणि उमेश पाटील यांचा समावेश असल्याचे समजते.