Mumbai Pune missing link Pudhari
मुंबई

Mumbai Pune missing link: विकासाच्या ‌‘कनेक्टिंग लिंक‌’ मधून कोकण गायब; मिसिंग लिंक सुसाट, मुंबई - गोवा महामार्ग जाम

कोकणच्या लोकप्रतिनिधींनी आता पुढाकारघेणे गरजेचे बनले आहे.

पुढारी वृत्तसेवा

अतुल गुळवणी

अलिबाग: गेल्याचआठवड्यात मुंबई -पुणे महामार्गावरील बहुचर्चित मिसिंग लिंकचे लोकार्पण करण्यात आले. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आता मिसिंग लिंक नव्हे तर विकासाची कनेक्टिंग लिंक असे संबोधले.यावरुन आता रखडलेल्या मुंबई - गोवा महामार्गाचेही अशाच शीघ्र गतीने काम करुन कोकणासाठीही विकासाची ‌‘कनेक्टिंग लिंक‌’ जोडली जावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे.कोकणच्या लोकप्रतिनिधींनी आता पुढाकारघेणे गरजेचे बनले आहे.

मिसिंंग लिंक मार्ग हा महायुती सरकारचा ड्रीम प्रोजेक्ट होता.अवघ्या सहा,सात वर्षात या प्रकल्पाची अत्याधुनिक तंत्रज्ञानाद्वारे उभारणी करण्यात आली आहे.यासाठी सात हजार कोटींचा खर्चही करण्यात आला आहे.

यामुळे मुंबई - पुणे एक्स्प्रेस वे वर बोरघाटात होणारी वाहतूक कोंडी आता कायमची संपुष्टात येणार आहे. तर प्रवासाचे अंतरही 30 मिनिटांनी वाचणार आहे.यामुळे या प्रकल्पावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथशिंदे यांनी विशेष लक्ष देत हा प्रकल्प पूर्णत्वास नेण्यात आला.आता त्याच धर्तीवर रखडलेल्या मुंबई - गोवा महामार्गाच्या पूर्णत्वाकडेही सरकारने लक्ष देऊन कोकणासाठी विकासाची कनेक्टिंग लिंक जोडून द्यावी,अशी मागणी जोर धरु लागली आहे.

मुंबई - गोवा महामार्ग गेली 17 वर्षे सुरू आहे. मात्र,अद्यापही तो पूर्ण झालेला नाही. दरवर्षी पूर्णत्वाची आश्वासने दिली जातात.मात्र, तो काही पूर्ण होत नाही, अशी गंभीर स्थिती निर्माण झाली आहे. राज्यकर्त्यांसह स्थानिक लोकप्रतिनिधीही या प्रकल्पाच्या पूर्णत्वाकडे म्हणावे तसे लक्ष देत नसल्याचे वास्तवही नाकारता येत नाही.

त्याबाबतचे सोयरसुतक त्या मंडळींना काहीच नसल्याचेही दिसून आले आहे. दरवर्षी या मार्गाच्या दुरुस्तीसाठी कोट्यवधींचा निधी खर्च केला जातो. मात्र रस्ता काही पूर्ण होताना दिसत नाही.आतापर्यंत हजारो अपघात या महामार्गावर घडून शेकडो जणांचा बळीही गेलेला आहे.तर हजारो कायमचे जायबंदी झालेले आहेत. प्रवासाचा कालावधीही किती लागेल हे सांगणे कठीण होऊन बसले आहे.

हा महामार्ग पूर्ण व्हावा यासाठी आतापर्यंत विविध राजकीय पक्ष संघटना,सामाजिक संघटना,पत्रकार संघटना यांनी अनेकदा आंदोलने केली आहेत.दस्तुरखुद्द केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनीही मुंबई - गोवा महामार्ग वेळेत पूर्ण होणे अशक्य असल्याचे सुचित केलेले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT